श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली ‘ऋतु हिरवा’ ही ध्वनिफीत म्हणजे मराठी भावसंगीतातील मैलाचा दगडच. हरहुन्नरी-ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी या गाण्यांचं सोनं केलं. हीच जोडी आता व्हीएसएस मल्टिमीडियाची निर्मिती असलेला ‘साकार गंधार हा’ हा नवा अल्बम घेऊन रसिकांसमोर येत आहे. या पाश्र्वभूमीवर श्रीधर फडके यांनी खास ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.
आजवर मी अनेक चित्रपटांना संगीत दिलं, अनेक ध्वनिफिती केल्या. मात्र, या सर्वात लोकप्रियतेचा कळस गाठला तो ‘ऋतु हिरवा’ या ध्वनिफीतीने. यातील कोणतंही गाणं कधीही ऐका, ते तितकंच आनंद देतं. याचं रहस्य काय, असा प्रश्न अनेकजण मला विचारतात. उत्तर अगदी सोपं आहे, अहो, ही गाणी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर आशाबाईंनी गायली आहेत. ती सदाबहार झाली नसती तरच नवल.
१९९१मध्ये आलेल्या या ध्वनिफितीनंतर आशाबाईंच्या आवाजात आणखी एक ध्वनिफीत करावी, अशी प्रबळ इच्छा होती. मात्र ही गाणी एवढी लोकप्रिय झाली की काही काळ थांबावं, असं ठरवलं. त्यानंतर ‘काही बोलायाचे आहे’, ‘तेजोमय नादब्रह्म’, ‘अबोलीचे बोल’, ‘हे गगना’, ‘संगीत मनमोही रे’, ‘लिलाव’ आदी माझ्या ध्वनिफिती एकापाठोपाठ येतच होत्या. यातील गाण्यांनाही रसिकांनी डोक्यावर घेतलं. मात्र आशाबाईंच्या आवाजातील ध्वनिफीत येण्यास बराच वेळ लागतोय, या भावनेने अस्वस्थताही होती. बरं, दुसरीकडे आशाबाईंसोबतच्या ध्वनिफितीची तयारी सुरू होतीच. उदाहरणच द्यायचं झालं तर, ‘मंदिरे सूनी सूनी कुठे न दीप काजवा’, ‘मेघ वाही श्रावणात ये सुगंधी गारवा’, या ग्रेस यांच्या कवितेला मी १९९५ मध्येच चाल लावली होती. इंदिरा संत यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेलं ‘रुतत चालले तिळातिळाने’ ही कविताही संगीतबद्ध होऊन तयार होती, तर या ध्वनिफितीचं ‘साकार गंधार हा’ हे शीर्षकगीत मी २००१ मध्येच शांता शेळके यांच्याकडून लिहून घेतलं होतं, त्याचीही चाल तयार होती. उर्वरीत गाणीही आकारास येत होती. मात्र, ध्वनिमुद्रणाचा योग येत नव्हता. या गाण्यांना आशाबाईंशिवाय कोणीही न्याय देऊ शकणार नाही, यावर मी ठाम होतो, म्हणूनच थांबलो. अखेर आशाबाईंच्या जादुई आवाजात या गाण्यांचं रेकाìडग पार पडलं. हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा होता. ही माझी गाणी आहेत म्हणून सांगत नाही, परंतु काय गायल्या आशाबाई.. ८०व्या वर्षांत पदार्पण केलेल्या या महान गायिकेचं सुरांवरील प्रभुत्व, दमसास, हरकती-ताना घेणं.. सगळंच अफाट. शब्दांचा भाव ओळखून गावं तर त्यांनीच. फारच विलक्षण आणि रोमांचकारी अनुभव होता तो.
मराठी गाण्यांच्या निवडीबाबत आशाबाई खूपच चोखंदळ आहेत. या ध्वनिमुद्रणानंतर त्यांनी माझ्या पाठीवर दिलेली शाबासकीची थाप खूप काही बोलून गेली. ‘ऋतु हिरवा’नंतर १० वर्षांनी म्हणजे २००१च्या आसपास ही ध्वनिफीत यावी, अशी माझी इच्छा होती, मात्र हा योग जुळून येण्यासाठी १२ वर्षांचा काळ जावा लागला. एकप्रकारे माझी तपश्चर्याच फळाला आली..
 ‘साकार गंधार हा’
 यात एकूण सात गाणी असून ती सर्व आशा भोसले यांनी गायली आहेत. शांता शेळके, इंदिरा संत, ग्रेस, सुधीर मोघे, अरुणा ढेरे, नितीन आखवे अशा प्रथितयश कवींच्या लेखणीतून या रचना उतरल्या आहेत. कोणत्याही महान गायकाच्या गळ्यात उपजत गंधार असतो, ही मध्यवर्ती कल्पना घेऊन एक गीत लिहून द्या, असं मी शांताबाईंना सांगितलं आणि त्यांनी ‘साकार गंधार हा, की मूर्त मंदार हा, मधुभाव रसराज, लयताल हा साज, हा नाद झंकार हा’ असं अप्रतिम गीत लिहून दिलं. धृपद धमारमधील नोम-तोमचा वापर यातील कोरससाठी केला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील शांततेची अनुभूती देणारं हे गाणं आशाबाईंच्या आवाजात ध्वनिमुद्रित करता आलं, हे माझं भाग्यच.