डोंबिवली परिसरातील अनेक नागरिकांना प्राप्तिकर विभागाच्या नवी दिल्ली कार्यालयाकडून प्राप्तिकर भरण्याबाबत नोटिसा आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. बहुतांशी नोटिसा ज्येष्ठ नागरिक, निवृत्त कर्मचारी यांना आल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. येत्या दहा दिवसांत विभागाला उत्तर दिले नाही तर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पॅन कार्ड प्राप्तिकर विभागाला कळविला आहे का, लहान रकमेवर टीडीएस भरला आहे का, मागील तीन वर्षांचा प्राप्तिकर भरल्याची इत्थंभूत माहिती मागविण्यात आली आहे. या नोटिसा हातात पडताच हवालदिल झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या फेऱ्या कर सल्लागार, सनदी लेखापाल यांच्याकडे वाढल्या आहेत. ‘टपाल तसेच बँकेतून मिळणाऱ्या व्याजावर दिवस काढतोय. आता सरकार आम्हाला त्रास देऊन काय साध्य करते आहे, असा सवाल काही ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केला. सनदी लेखापाल उदय कर्वे यांनीही या वृत्ताला दुजोरा देताना दररोज सात ते आठ नागरिक दिल्ली प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा घेऊन आमच्याकडे विचारणास करण्यासाठी येत आहेत, असे सांगितले. या नोटिसीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बहुतांशी नागरिक ज्येष्ठ, वृद्ध असल्याने त्यांना त्रास देण्याचा हा प्रयत्न केविलवाणा आहे. प्राप्तिकर विभागाच्या मुंबई विभागाशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी या विषयाशी आमचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे ते म्हणाले.