पाश्चिमात्य देशात ‘प्रोस्टेट कॅन्सर’च्या रुग्णांची संख्या मोठी असली तरी भारतातही पुरुषांमध्ये त्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. प्रोस्टेट संबंधी समस्या निर्माण झाल्यास त्वरित उपचार  करून घ्यावेत, असा सल्ला मूत्रपिंड तज्ज्ञांनी दिला आहे.
प्रोस्टेट ग्रंथी पुरुषांच्या मूत्राशयाच्या खाली असतात. ही ग्रंथी वीर्य निर्माण करते. या ग्रंथीमध्ये काही समस्या निर्माण झाल्यास त्याकडे रुग्ण दुर्लक्ष करतो. जेव्हा वेळोवेळी लघवीला जाण्याची इच्छा होते, तेव्हा प्रोस्टेट ग्रंथींमध्ये काही समस्या निर्माण होत आहेत, असे समजावे. अशावेळी तपासणी करून घ्यावी, असा सल्ला  मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. सुहास साल्फेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला. अशा समस्या निर्माण झाल्यास ५० वर्षांवरील पुरुषांनी डिजिटल रेक्टम परीक्षण (डीआरई) व रक्त तपासणी करून घ्यावी. या तपासणीतून प्रोस्टेट ग्रंथीमध्ये कर्करोग आहे किंवा नाही, याची माहिती मिळते. पुरुषांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. असे आजार कुटुंबातील प्रमुख पुरुषाला असेल तर ते मुलांमध्ये येऊ शकतात. ही टक्केवारी १० ते ५० एवढी आहे. दोन वर्षांपूर्वी प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग असलेले १५ ते २० रुग्ण दर महिन्याला आढळून येत असत, पण सध्या एका महिन्यात ३० रुग्ण आढळून येत असल्याचेही डॉ. साल्फेकर यांनी सांगितले.
या आजाराविषयी नागरिकांना माहिती व्हावी म्हणून संपूर्ण जगातच सप्टेंबर महिन्यात जनजागृती केली जाते. या निमित्त नागपुरातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहितीही डॉ. साल्फेकर यांनी दिली.