कराड तालुक्यात राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियानांतर्गत घडीपत्रिका व चित्ररथाद्वारे कुपोषणमुक्तीसाठी जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात दीडशे गावांमध्ये हा जागृतीपर उपक्रम आयोजित केला आहे.
कुपोषणाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांचा प्रारंभ कराड पंचायत समिती सभापती देवराज पाटील व उपसभापती विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते झाला. या वेळी गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी अधिकराव कदम, सौ. यु. जे. साळुंखे, टी. बी. शिंदे यांची उपस्थिती होती.
गरोदरपणात महिलांना व जन्मानंतर बालकांना पहिल्या २ वर्षांत योग्य आहार न मिळाल्यास त्या बालकाच्या शारीरिक, मानसिक व बौध्दिक विकासावर दूरगामी परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. कुपोषणाचे हे दुष्परिणाम रोखण्यासाठी शासनाने गतवर्षी राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान सुरू केले. या अभियानात ३ ते ६ वर्षांतील मुलांवर अधिक भर देण्यात आला. परंतु, कुपोषण मुख्यत: पहिल्या २ वर्षांत होत असल्याने शासनाने राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान या नावाने सुधारित अभियान राबविण्यास सुरूवात केली आहे. पूर्वीचे गावकेंद्रित स्वरूपाचे हे अभियान आता अंगणवाडीला केंद्रबिंदू मानून राबविण्यात येत आहे. या अभियानातून पहिल्या दोन वर्षांतील आहाराचे महत्त्व विविध माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवून कुपोषण निर्मूलन करण्याचा प्रयत्न राहणार आहे. कराड तालुक्यात पहिल्या टप्प्यात दीडशे गावांत हा उपक्रम राबविला जाणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, आरोग्य कर्मचारी यांचा प्रयत्न असल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी दिली.