27 September 2020

News Flash

पनवेल-चिपळूण गाडी दिव्याहून सोडा

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या विशेष गाडय़ांपकी एकाही गाडीला दिवा स्थानकात थांबा न दिल्याने प्रवासी नाराज आहेत.

| August 13, 2015 02:54 am

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या विशेष गाडय़ांपकी एकाही गाडीला दिवा स्थानकात थांबा न दिल्याने प्रवासी नाराज आहेत. दिवा स्थानकातील थांबा उपनगरीय रेल्वेसाठी कटकटीचा असल्याने रेल्वेने हे थांबे नाकारले आहेत. मात्र मध्य रेल्वेने जाहीर केलेली पनवेल-चिपळूण ही गाडी पनवेलऐवजी दिव्याहून सोडण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. ही गाडी दिव्यापल्याड उपनगरीय रेल्वेमार्गावर येणार नसल्याने रेल्वेला यात कोणतीही अडचण नसावी, अशी अपेक्षाही प्रवाशांनी व्यक्त केली आहे. गाडी पकडण्यासाठी किंवा चिपळूणकडून परत आल्यानंतर घर गाठण्यासाठी पनवेल हे खूपच अडनिडे ठिकाण असल्याचा युक्तिवाद प्रवाशांनी केला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात रेल्वेतर्फे मुंबईतील चाकरमान्यांसाठी २२४ विशेष गाडय़ा चालवल्या जातील, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केले होते. या घोषणेनुसार जाहीर झालेल्या एकाही गाडीला दिवा स्थानकात थांबा नाही. या गाडय़ांना ठाण्याबरोबरच दिवा येथेही थांबा मिळावा, अशी मागणी अनेक प्रवासी करत आहेत. मात्र लांब पल्ल्याच्या गाडय़ा दिवा स्थानकात थांबवताना उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीला त्याचा फटका बसतो, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे या गाडय़ांचा दिवा थांबा फेटाळण्यात आला आहे.यंदाच्या गणेशोत्सवात मध्य रेल्वेने चिपळूणपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पहिल्यांदाच विशेष डेमू सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा पनवेल-चिपळूण या मार्गावर चालवण्यात येणार आहे. ४ ते ३० सप्टेंबर दरम्यान ही गाडी सकाळी ११.१० वाजता पनवेलहून निघून रात्री १०.३० वाजता पनवेलला परतणार आहे. ही गाडी दिवा स्थानकातून सोडावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. बदलापूर, कल्याण, अंबरनाथ, डोंबिवली, विक्रोळी, घाटकोपर येथील प्रवाशांना पनवेलला जाऊन ही गाडी पकडण्यापेक्षा ती दिवा स्थानकात पकडणे कधीही सोयीचे आहे. ही गाडी दिवा स्थानकातूनच सुटणार असल्याने उपनगरीय सेवेवरही तिचा परिणाम होणार नाही. तसेच रात्री उशिरा ही गाडी दिवा येथे पोहोचली, तरी प्रवाशांना उपनगरीय सेवेचा पर्याय पनवेलपेक्षा जास्त सहज उपलब्ध असेल, असे या प्रवाशांचे म्हणणे आहे. दिवा स्थानकातून ही गाडी सोडण्यासाठी रेल्वेला फक्त ३०-४० मिनिटे आधी सोडावी लागेल, असे काही प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. दरम्यान, दिवा स्थानकात देखभाल दुरुस्तीची सुविधा नसल्यामुळे ही गाडी तेथून सोडणे रेल्वेला शक्य नसल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंह यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2015 2:54 am

Web Title: people demands for konkan railway departure from diva station
टॅग Konkan Railway
Next Stories
1 तांत्रिक करामतीत स्मार्ट गुन्हेगार चार पावले पुढेच!
2 रुग्णांची जीवनशैली सुधारण्याचे आयुर्वेदिक प्रयत्न ‘कॅन्सरसाठी लोकोपयोगी आयुर्वेद’ पुस्तकाचे प्रकाशन
3 स्वाइन फ्लूच्या लसीसाठी गर्भवतींचा थंडा प्रतिसाद
Just Now!
X