News Flash

ज्योत मशाल व्हावी अन् दामिनी सशक्त व्हावी… शोभेच्या दारूकामाद्वारे जनप्रबोधन

उंच आकाशामध्ये झेपावत फुटणारे औटगोळे, त्यातून प्रकट होऊन काही क्षणात लुप्त होणारे रंगीबेरंगी तारे, तारामंडल, म्हैसूर कारंजे, धबधबे आदी पारंपरिक कृतींबरोबरच सध्या समाजात महिलांवर होणारे

| January 15, 2013 08:49 am

उंच आकाशामध्ये झेपावत फुटणारे औटगोळे, त्यातून प्रकट होऊन काही क्षणात लुप्त होणारे रंगीबेरंगी तारे, तारामंडल, म्हैसूर कारंजे, धबधबे आदी पारंपरिक कृतींबरोबरच सध्या समाजात महिलांवर होणारे अत्याचार, विशेषत: नवी दिल्लीत धावत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्याच्या पाश्र्वभूमीवर ‘ज्योत मशाल व्हावी अन् दामिनी सशक्त व्हावी’ यांसारखी नेमके प्रबोधनपर संदेश देणारी घोषवाक्ये शोभेच्या दारूकामाद्वारे पाहून लाखो नेत्रांचे पारणे फिटले. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची सांगता मंगळवारी रात्री या नयनरम्य शोभेच्या दारूकामाच्या आतषबाजीने झाली.
चार दिवस चालणाऱ्या सिद्धेश्वर यात्रेचा समारोप होम मैदानावर शोभेच्या दारूकामाने होतो. सुमारे साडेआठशे वर्षांपासूनची ही प्राचीन परंपरा आहे. या यात्रेतील शोभेच्या दारूकामाची ख्याती महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशात पोहोचली आहे. यंदा शोभेच्या दारूकामाची सेवा रुजू करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हय़ासह सातारा व बीड आदी भागांतून पाच कलावंतांनी भाग घेतला होता. मैदानावर धुळीचे प्रदूषण होऊन नये म्हणून सर्वत्र पाण्याचे फवारे मारण्यात आले होते.
यात्रेनिमित्त पारंपरिक पद्धतीने सायंकाळी सिद्धेश्वराच्या नंदीध्वजांची मिरवणूक उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाडय़ातून निघाली. ही मिरवणूक होम मैदानावर पोहोचताच ‘एकदा भक्तलिंग हर बोला हर-सिद्धेश्वर महाराज की जय’ या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला. त्याच वेळी शोभेच्या दारूकामाविषयीची सर्वाची ताणली गेलेली उत्सुकता संपली. नंदीध्वज होम मैदानावर दाखल होताच शोभेच्या दारूकामाला थाटात प्रारंभ झाला. विविध कलाकृतींमधून साकार झालेले सिद्धेश्वर मंदिर, इंडिया गेट, चार मिनार, तारामंडल, राज दरबारी, उगवता सूर्य, ५० फुटी धबधबा, सोनेरी धबधबा, पृथ्वी, कलर ट्री, जोगचा धबधबा, म्हैसूर कारंजा, ओम मंदिर, अशोक चक्र, पंचमुखी चक्र, अश्रफी अनार, पृथ्वी, सोनेरी अनार, डिस्को लाईट इत्यादी विविध शोभेच्या दारूकामाचे आकर्षक प्रकार सादर करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धेश्वर यात्रेत शोभेच्या दारूकामामध्ये सातत्याने पहिले बक्षीस मिळविणारे एम. ए. पटेल यांनी विविध कलात्मक, सुंदर नक्षीकाम असलेले दारूकाम सादर करून सध्याच्या ज्वलंत सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधले आणि सर्वाची वाहवा मिळविली. शोभेच्या दारूकामाचा वापर निखळ मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधन करणारे अनेक सुंदर कलाविष्कार सादर करून पटेल यांनी सर्वाची मने जिंकली. यापूर्वी पटेल यांनी याच यात्रेत शोभेच्या दारूकामाच्या माध्यमातून मुंबईतील गाजलेला आदर्श सोसायटी घोटाळा, केंद्रातील स्पेक्ट्रम घोटाळा, धान्य घोटाळा, वाढती महागाई असे एकापाठोपाठ एक मुद्यांवर घोषवाक्यांद्वारे लक्ष वेधत समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला केला होता. यंदा त्यांनी महिला अत्याचारावर शोभेच्या दारूकामाच्या माध्यमातून प्रकाश टाकत सर्वाचे लक्ष वेधले. नवी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराचा संवेदनशील प्रश्नाला हात घालताना पटेल यांनी. ‘ज्योत मशाल व्हावी अन् दामिनी सशक्त व्हावी’ अशी भावना व्यक्त करणारे घोषवाक्य शोभेच्या दारूकामातून साकार केले आणि संपूर्ण समाजमनाचा ठाव घेतला. ‘मुली वाचवा’ हा संदेशही त्यांनी नेमक्या पद्धतीने दिला. याशिवाय सध्याच्या तीव्र दुष्काळात ग्रामीण शेतकरी होरपळला जात असताना पाण्याचे महत्त्वही पटेल यांनी पटवून देण्यासाठी शोभेच्या दारूकामाचा परिपूर्ण वापर केला. ‘पाणी हे जीवन-वापर करा जपून’ हा संदेश सर्वाच्या पसंतीला उतरला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगच्या ईरप्पा रेवप्पा केशेट्टी यांनी सिद्धेश्वर मंदिर, इंडिया गेट, नागराज, महादेवाची पिंड, तारामंडल, पन्नास फुटी धबधबा आदी पंधरा प्रकार सादर केले. तर बीड जिल्हय़ातील चौसाळा येथील जय महाराष्ट्र फायर वर्क्सने धबधबा, चाफा, चांदणी रंगोत्सव, दिल, रंगीत मिनार, रंगीत सुरू, धावते चक्र, डिजिटल रंगीबेरंगी औटगोळे पेश केले. तर करमाळा तालुक्यातील रोशेवाडीच्या उत्सव फायर वर्क्सने नर्गिस, २५ फुटी धबधबा, सुरू वृक्ष आदी तेरा प्रकार सादर करून सर्वाना आनंद दिला. कराड येथील आदित्य फायर वर्क्सतर्फे सुदर्शन चक्र, छत्री चक्र, नर्गिस वृक्ष, डिस्को वृक्ष, पाच गोलाकार चक्र अशा कलात्मक कृतींचे दर्शन घडविण्यात आले. या शोभेच्या दारूकामाच्या स्पर्धेसाठी यंदाच्या वर्षी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर व सोलापूर महापालिकेचे आयुक्त अजय सावरीकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. परीक्षकांनी रात्री उशिरा निकाल जाहीर केला. विजेत्या कलावंतांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यात्रा शोभेचे दारूकाम समितीचे सभापती मल्लिकार्जुन कळके यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 8:49 am

Web Title: people enlightenment by fireworks
Next Stories
1 वाईत पाणीपुरवठा विस्कळीत
2 लाच स्वीकारणाऱ्या पोलीस शिपायास अटक
3 कराड क्लबच्या क्रिकेट स्पर्धेत शिवाजी विद्यालय विजयी
Just Now!
X