जरीपटक्यातील गोळीबाराची घटना ताजी असतानाच काल गुरुवारी सक्करदऱ्यात पुन्हा तिघांच्या हत्येचा थरार अनेकांनी अनुभवला. उपराजधानीतील हिंसाचाराने नक्षलग्रस्त गडचिरोलीला केव्हाच मागे टाकलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी आयुक्तांच्या उचलबांगडीसाठी आता ‘मुहूर्त’ शोधत आहेत का? येथील पोलीस यंत्रणा तंदुरुस्त करण्यासाठी फडणवीसांना आणखी किती हिंसाचार हवा आहे, असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
रात्रीचे दहा ही तशी झोपण्याची वेळ नाही. या वेळात शहरात भरपूर वर्दळ असते. त्याची अजिबात तमा न बाळगता गुंडांनी काल सक्करदरा परिसरात तिघांचे मुडदे पाडले. अगदी पाठलाग करून एकाच कुटुंबातील तिघांना ठार मारण्यात आले. या थरारक हत्याकांडाने सामान्य जनता भेदरलेली असताना या शहरातील पोलीस मात्र गुंडांनी गुंडांचे खून पाडले अशा शब्दातया हिंसाचाराचे अप्रत्यक्षपणे समर्थन करीत आहेत. मारणारे आणि मरणारे भलेही गुंड असले तरी या हिंसाचाराचे समर्थन होऊच शकत नाही. प्रत्येकानेच कायदा हातात घेण्याचे ठरवले तर कायदा व सुव्यवस्था ही बाबच पोलिसांच्या कर्तव्यातून काढून टाकावी लागेल. मुळात या शहरातील गुंडांना पोलिसांची भीतीच उरलेली नाही. अपहरण, खून, खंडणी व बलात्कार काहीही केले तरी पोलीस आपलेच आहेत, अटकेनंतर बडदास्त ठेवणारे आहेत, शिवाय सर्व सोयींनी युक्त असे कारागृह आहेच अशी मनोवृत्ती या गुन्हेगारांमध्ये बळावली आहे. त्यामुळेच त्यांचे हात गुन्हा करण्यासाठी धजावतात.
गुन्हेगारी विश्वात ही अवस्था तेव्हाच निर्माण होते जेव्हा पोलीस अपयशी ठरतात. या शहराचे नेमके तेच झाले आहे. तरीही गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री फडणवीस आयुक्त के.के. पाठक यांच्या पाठीवरचा आपला हात काढायला तयार नाहीत. गुन्हेगारी कमी झाली असा दावा करणारा आकडेवारीचा कागद हाती घेऊन फिरणारे पोलीस एकीकडे व हा दावा तत्परतेने खोडून काढण्यासाठी हातात शस्त्रे घेऊन फिरणारे गुंड दुसरीकडे असे दुर्दैवी चित्र या शहरात दिसू लागले आहे. सक्करदऱ्यात झालेले तिहेरी हत्याकांड जुगार अड्डय़ाच्या भांडणातून घडले अशी प्राथमिक माहिती आहे. या शहरातले जुगाराचे अड्डे हा पोलिसांच्या अपयशाचा आणखी एक पुरावा आहे. संपूर्ण शहरात लहान, मोठे मिळून आठशे ते हजार जुगार अड्डे आहेत. अनेक ठिकाणी हे अड्डे राजरोसपणे चालतात. ते चालवणाऱ्या प्रत्येकाचे राजकीय लागेबांधे आहेत. शहरात नवीन उपायुक्त आले की या अड्डय़ावर छापा टाकण्याचे नाटक होते. नंतर सारे काही सुरळीत होते. कारवाई आणि हफ्ता या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे यातून नेहमी दिसून येते. या अड्डय़ांवर केवळ जुगारच चालत नाही तर सट्टा सुद्धा लावला जातो. आता आयपीएल सुरू झाल्याने या सट्टय़ाला कमालीची तेजी आली आहे. या अड्डय़ांवरून गुंडांमध्ये होणारे वाद नवे नाहीत. यातून हिंसाचार घडतो. हे सारे आयुक्त पाठकांना ठाऊक नाही असे समजण्याचे काही कारण नाही. तरीही ते गुन्हेगारी कमी झाल्याचा कागद फडकावत असतील तर त्याला आंधळेपणा म्हणावा लागेल. ३० लाख लोकसंख्येच्या या शहरात गुन्हे घडणारच यात वाद नाही, पण ज्या पद्धतीने गुंडांनी येथे हैदोस घातला आहे तो कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आहे या दाव्यातला फोलपणा जाणवून देणारा आहे. तरीही मुख्यमंत्री पाठकांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी काही काळ वाट बघणार असतील तर या शहरातील नागरिकांचे काही खरे नाही.
या शहरातला एकही असा भाग नाही जिथे गुन्हेगारांनी उच्छाद मांडलेला नाही. पश्चिम नागपूर हे तुलनेने शांत समजले जायचे, पण आता तिथेही गुंडांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अख्खे शहरच गुन्हेगारी विश्वात व्यापलेले असतानाही सरकारला जाग येत नसेल तर राज्यकर्त्यांना ‘निरो’ उपमा देण्यास काही हरकतनाही. येथील गुन्हेगारीची चर्चा विधिमंडळात झाल्यानंतर राज्यकर्त्यांच्या वर्तुळातून हळूच बातम्या पेरण्यात आल्या. फडणवीस पोलिसांवर नाराज, पाठकांची बदली होणार असे त्याचे स्वरूप होते. मुळात ही युक्ती आता जनतेच्या लक्षात आलेली आहे हे फडणवीसांच्या लक्षात यायला हवे. अशा बातम्या पेरण्यापेक्षा कृती करा, पाठकांना हवे तिथे बसवा, पण येथील अकार्यक्षम पोलीस दलाचे लवकर शुद्धीकरण करा, असे मुख्यमंत्र्यांना सांगण्याची वेळ येथील जनतेवर आली आहे. अनेक राज्यकर्ते कृतीसाठी ‘मुहूर्त’ शोधतात. मुख्यमंत्री या शुद्धीकरणासाठी मुहूर्ताच्या शोधात तर नाही ना अशी शंका आता यायला लागली आहे. शेवटी हा हिंसाचार नागपूरकरांनी किती काळ सहन करायचा? आता सहनशीलतेनेही सीमा गाठली आहे हे फडणवीस ध्यानात घेणार की नाही?