वोक्हार्ट हार्ट हॉस्पिटलच्या शुभारंभानिमित्त डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ‘गाता रहे मेरा दिल’ हा हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास सामान्य नागरिकांसह रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पद्मश्री मॅथ्यु सॅम्युअल आणि वोक्हार्ट ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका जहाबिया खोराकीवाला यांनी दीप प्रज्वलित करून या संगीतसंध्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. सर्वप्रथम सारेगामा फेम समेधा करमाहे, विशाल कोठारी आणि दिनेश सोनी यांनी गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी खोराकीवाला म्हणाल्या, विविध आजार, कर्करोग आणि श्वसनासारख्या समस्या दीर्घकालीन रोगांनी त्रस्त असलेल्या रुग्णांवर संगीताचा सकारात्मक परिणाम होतो, हे संशोधनांती सिद्ध झाले आहे. संगीत हा एक असा धागा आहे की, तो लोकांना जोडतो. रुग्णांच्या आरोग्य आणि आनंदाला महत्त्व देण्यासाठी संगीतसंध्या आयोजित करण्यामागचा हेतू आहे. संगीत आणि आरोग्य एकमेकांशी पूरक आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही अत्याधुनिक कॅथ लॅबसह वोक्हार्ट हार्ट हॉस्पिटलचा शुभारंभ साजरा करीत आहोत. नागपूरचे हृदय सुदृढ ठेवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
 वोक्हार्ट हॉस्पिटल ग्रुपचे अध्यक्ष अनुपम वर्मा म्हणाले, वोक्हार्ट हॉस्पिटल रुग्णांच्या उत्तम आरोग्य आणि त्यांच्या आनंदासाठी प्रयत्न करीत असतो. हॉस्पिटलच्या शुभारंभामुळे आम्हाला शहर आणि आजुबाजूच्या रुग्णांना अत्याधुनिक सुविधा प्रदान करण्याची संधी प्राप्त झाली आहे. अत्याधुनिक कॅथलॅबच्या मदतीने आम्ही अत्यवस्थ रुग्णांना उत्तम उपचार प्रदान करणार आहोत. यावेळी हॉस्पिटलचे वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर्स व अन्य कर्मचारी उपस्थित होते.