कल्याण डोंबिवली ते टिटवाळादरम्यान २२ हजार विजेचे खांब आहेत. या दिवाबत्तीची देखभाल, दुरुस्ती करणाऱ्या पाच ठेकेदारांचे प्रस्ताव बुधवारी सदस्यांनी स्थायी समिती सभेत फेटाळले. या ठेकेदारांच्या कामांची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे देखभाल, दुरुस्ती अभावी दिवाबत्तीची सेवा बंद पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या सात प्रभागांमधील विजेच्या खांबांवरील दिवे, तेथील दुरुस्ती, देखभाल करण्याची कामे खासगी विद्युत ठेकेदार करीत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून या ठेकेदारांची कामे सुरू आहेत. ‘ड’ प्रभागातील ठेकेदार प्रमोद इलेक्ट्रिकल्स हा व्यवस्थित काम पाहत नाही. नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. तरी त्याची देयके काढली जात आहेत. पालिकेचा विद्युत विभाग या ठेकेदाराला काळ्या यादीत का टाकत नाही. त्याच्यावर आतापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली असे प्रश्न स्थायी समिती सभेत सदस्यांनी उपस्थित केले. या ठेकेदाराच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने अन्य ठेकेदारांचे प्रस्तावही समितीने गुंडाळून ठेवले. स्थायी समितीने अन्य प्रभागांमध्ये चांगले काम करणाऱ्या पाच ठेकेदारांचे प्रस्तावही फेटाळून लावले. प्रमोद ठेकेदार वगळता इतर प्रभागातील ठेकेदारांच्या कामाबाबत तक्रारी नसतील तर त्यांचे प्रस्ताव फेटाळून समितीने काय साध्य केले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्थायी समिती सभापती प्रकाश पेणकर म्हणाले, प्रमोद इलेक्ट्रिकल्स या ठेकेदाराविषयी अनेक तक्रारी आहेत. त्याच्यावर विद्युत विभागाने काय कारवाई केली हे सदस्यांना पाहायचे आहे. असे कामचुकार ठेकेदार काम न करता देयके घेत असतील तर ते चूक आहे. ३१ जुलैच्या आत सर्व विद्युत देखभालीचे ठेके मंजूर करण्यात येणार आहेत. पालिका कर्मचारी ही कामे करू शकत नाही. त्यामुळे या कामासाठी ठेकेदारी पद्धत योग्य आहे.
* दिवाबत्तीच्या देखभालीचे काम अडकणार
* पाच ठेकेदारांचे प्रस्ताव फेटाळले
* नीट देखभाल न करणाऱ्या ठेकेदाराच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्न चिन्ह
*  चांगले ठेकेदारही अडचणीत