शहरातील वेगवेगळ्या भागात चोरटय़ांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून चोरीच्या पाच, घरफोडीच्या दोन तर जबरी चोरीची एक याबरोबर वाहन चोरीच्या दोन अशा दहा घटनांमध्ये पुन्हा एकदा लाखोंचा ऐवज लंपास झाला आहे. पाथर्डी फाटा येथील एका घटनेत डिकीत ठेवलेली तीन लाखाची रोकड चोरटय़ांनी लंपास केली. अशोका मार्गावरील घटनेत दुकानात सिगारेट घेण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन चोरटय़ांनी गळ्यातील चेन खेचून पोबारा केला.
मागील दोन दिवसात चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. उन्हाळी सुटीत  बाहेरगावी गेलेल्या कुटुंबीयांची घरे धुंडाळून चोरटे ती लक्ष्य करत होते. त्या काळात घरफोडी व चोरीच्या घटनांच्या उंचावलेल्या आलेखाची परंपरा सुटीचा कालावधी संपुष्टात येऊनही कायम असल्याचे दिसत आहे. पाथर्डी फाटालगतच्या वासन टोयाटो दालनासमोर मोटारसायकलच्या डिकीमधून चोरटय़ांनी दुपारच्या वेळी तीन लाख रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी केनी कटारिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटय़ांनी मोटारसायकलची सीट कशाने तरी तोडून डिकीतून ही रक्कम लांबविली. सिडकोतील टेक्नोक्राफ्ट कॉम्प्युटर कंपनीच्या कार्यालयाचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी ७४ हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेला. त्याच प्रकारची घटना अंबडमधील महालक्ष्मीनगर येथे घडली. बंद दुकानाचे शटर वाकवून चोरटय़ांनी यंत्र, कॉम्प्युटर, सिलिंडर अशा ६७ हजार रुपयांच्या वस्तू लंपास केल्या. या दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर रस्त्यावरील दुर्गेश इमारतीत एका बंद घरातून २८ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरटय़ांनी लंपास केली. या प्रकरणी नंदू शेजूळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोका मार्गावरील राजसारथी किराणा दुकानात रजनी कापुरे यांच्या गळ्यातील १८ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून दोन संशयितांनी पळ काढला. सिगारेट घेण्याच्या बहाण्याने दोन जण या दुकानात आले. सिगारेट घेतल्यानंतर संबंधितांनी आणखी एका वस्तूची मागणी केली. कापुरे ती घेण्यासाठी मागे वळल्यानंतर चोरटय़ांनी चेन खेचून पलायन केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनचोरीचे सत्रही आटोक्यात आलेले नाही. नाशिक रोडच्या जेतवननगर परिसरात श्रीप्रसाद क्षीरसागर यांची रिक्षा घराजवळून चोरटय़ांनी पळवून नेली. दिंडोरी रस्त्यावरील आकाश पेट्रोल पंपालगत गोपीनाथ बोडके यांच्या राहत्या घराजवळून त्यांची ५० हजार रुपये किमतीची बुलेट चोरटय़ांनी पळवून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भ्रमणध्वनी लंपास करणे व इतर काही भुरटय़ा चोऱ्यांचे प्रकार वारंवार घडत असल्याचे पोलीसदप्तरी दाखल गुन्ह्यांवरून स्पष्ट झाले आहे.