पोलीस आणि नागरिकांमध्ये सुसंवाद निर्माण होण्यासाटी पोषक वातावरण निर्मितीच्या कितीही गमजा मारल्या गेल्या, तरी एखादी तक्रार घेऊन पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील बहुतांश नागरिकांना अजूनही भीती वाटते, असा स्पष्ट निष्कर्ष ‘लोकसत्ता’ने यासंबंधी केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात शासकीय यंत्रणा अयशस्वी ठरल्यानेच जागोजागी स्थानिक ‘रॉबीन हुड’ निर्माण झाले असून परिसरात राहायचे असेल तर त्यांच्याशी जुळवून घ्यावेच लागते, असे मत या सर्वेक्षणात अनेकांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे पोलिसांपेक्षा अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेची समांतर यंत्रणा राबविणाऱ्या स्थानिक महंतांचाच आम्हाला आधार वाटतो, असा सूर व्यक्त होताना दिसत आहे. सार्वजनिक उत्सवात पोलीस आणि स्थानिक प्राधिकरणांच्या डोळ्यादेखत नीती-नियमांचे तीनतेरा वाजविले जात असताना हे रोखण्याचे ज्यांचे काम आहे ते गप्प बसतात. मग आम्ही तक्रारी करून काय होणार, अशी हतबल आणि काहीशी नकारात्मक भावनाही या सर्वेक्षणात अनेकांनी व्यक्त केली.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोडणाऱ्या नौपाडा पोलीस ठाण्यात दहीहंडी उत्सवातील ध्वनी प्रदूषणाची तक्रार करावयास गेलेले ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांना पोलीस ठाण्याच्या आवारात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केली. ठाण्यातील रहिवाशांना एखादी तक्रार घेऊन निर्धोकपणे पोलीस ठाण्यात जाता यावे असे वातावरण मी तयार करीन, अशी घोषणा येथील पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताना के. पी. रघुवंशी यांनी केली होती. याच रघुवंशी यांच्या काळात इंदुलकरांना पोलिसांनीच बुकलले आणि दोन वर्षांपूर्वी आयुक्तांनी केलेल्या घोषणेचा फुगा ठाण्यातील सामाजिक चळवळीला ‘आव्हान’ देतच फुटला. यानिमित्ताने लोकसत्ताच्या ‘ठाणे वृत्तान्त’ टीमने नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या परिसरातील सुमारे २२० नागरिकांना वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले. यामध्ये नोकरदार स्त्री-पुरुष , प्राध्यापक, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, सी.ए. बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर्स, व्यापारी, कलावंत, गृहिणी, चतुर्थ श्रेणी कामगार तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे. पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करायची तुम्हाला भीती वाटते का? पोलीस ठाण्यात तुम्हाला कशाप्रकारची वागणूक मिळेल असे वाटत? आणि सार्वजनिक उत्सवातील गैरप्रकारांची तक्रार नोंदवून न्याय मिळेल का ? अशा स्वरूपाचे तीन प्रमुख प्रश्न ‘वृत्तान्त’च्या टीमने या नागरिकांना विचारले. या सर्वेक्षणातून पुढे आलेल्या निष्कर्षांतून सर्वसामान्य नागरिकांना पोलीस ठाण्यात जाण्याविषयी भीती वाटत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.      
 पोलीसठाण्याची पायरी नकोच
एखाद्या सामाजिक प्रश्नावर अथवा व्यक्तिगत तक्रारी घेऊन पोलीस ठाण्यात जायला भीती वाटते, अशी स्पष्ट प्रतिक्रिया २२० पैकी १५७ ( ७१ टक्के) नागरिकांनी या सर्वेक्षणात व्यक्त केली. त्यापैकी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरातील सर्वाधिक ७५ टक्के रहिवाशांना पोलीस ठाण्याची पायरी नकोशी वाटते. मनावर दडपण येते, असे सांगितले. उगाच आपला अपमान नको म्हणून शक्यतो पोलिसांच्या नादास लागत नाही, असेही त्यांनी सांगितले. पोलीस ठाण्यात काही काम असेल तर लोकप्रतिनिधींची मदत घेतो, असे यापैकी अनेकांनी प्रांजळपणे नमूद केले. एका नोकरदार तरुणाने सांगितलेला अनुभव अंतर्मुख करणारा आहे. स्थानिक कार्यक्रमास परवानगी मिळविण्याचा अर्ज घेऊन तो पोलीस ठाण्यात गेला असता अर्वाच्य भाषेत त्याचे स्वागत झाले. त्यानंतर आपण कधीही पोलिसांच्या वाटेला गेलो नसल्याचेही त्याने सांगितले. सामाजिक प्रश्नांवर पोलीस ठाण्यात जाऊन फारसे काही हाशील होईल असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया बहुतांश नागरिकांनी व्यक्त केली. अशा प्रश्नांविषयी पोलिसांकडे तक्रार केल्यास तक्रारदारालाच आरोपीच्या िपजऱ्यात उभे केले जाते, असा अनुभव काहींना सांगितला. मोबाइल हरवल्याची तक्रार करायला गेले असता ठाणे शहरातील एका पोलीस ठाण्यात ‘एवढा महाग मोबाइल वापरायची गरज काय? बॉयफ्रेंडशी बोलण्यासाठी वापरता काय ? ’, अशा धक्कादायक प्रश्नांना सामोरे जावे लागल्याचा अनुभव एका तरुणीने सांगितला. एखादी वस्तू चोरीला गेल्यास तक्रार करून ती परत मिळण्याची हमी नसते. त्यामुळे आम्ही पोलीस ठाण्यात जातच नाही, असेही काहींनी सांगितले.
न्याय म्हणजे काय रे भाऊ?
सार्वजनिक उत्सवात नियम धाब्यावर बसविले गेल्यास त्याची तक्रार करून न्याय मिळेल असे वाटते का, या प्रश्नावर ७४ टक्के नागरिकांना असे वाटत नाही. २२० पैकी १६४ जणांनी न्याय म्हणजे काय रे भाऊ? असा सवाल केला. अनेकांना पोलिसांकडून न्याय मिळेल असे अजिबात वाटत नाही. सार्वजनिक उत्सवांच्या मांडवासमोरच पोलीस बंदोबस्त असतो. जे काही चालले आहे, त्याला ते साक्षीदारच असतात. त्यामुळे उत्सवांमधून उपद्रव होत असूनही कधीही तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नसल्याचे मत बहुतांश नागरिकांनी नोंदविले. विशेष म्हणजे या सर्वेक्षणात कुणाचेही नाव छापून येणार नाही, हे सांगूनही काहींनी याविषयी धार्मिक भावनांचा प्रश्न असल्याचे सांगून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. ‘पाण्यात राहून मगरीशी वैर करण्यात काय अर्थ आहे ?’ अशा अर्थाचा प्रतिसवाल याविषयी काहींनी विचारला.
* पोलिसांपेक्षा अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेची समांतर यंत्रणा राबविणाऱ्या स्थानिक महंतांचाच आम्हाला आधार वाटतो
* सार्वजनिक उत्सवात पोलीस आणि स्थानिक प्राधिकरणांच्या डोळ्यादेखत नीती-नियमांचे तीनतेरा वाजविले जात असताना हे रोखण्याचे ज्यांचे काम आहे ते गप्प बसतात. मग आम्ही तक्रारी करून काय होणार?