बदलती जीवनशैली त्याचबरोबर आहार-विहार आणि मन:स्वास्थ्य यांचे बिघडलेले संतुलन हे आजारांचे प्रमुख कारण आहे. आहार-विहार-मनाचे संतुलन राखल्यास शरीरात कोणताही आजार मूळ धरू शकत नाही, असे प्रतिपादन ‘विश्वमंगल आयुर्वेद हॉस्पिटल’चे संस्थापक तसेच व्यवस्थापकीय संचालक डॉ. स्नेहलकुमार रहाणे यांनी ठाण्यात केले.
नौपाडय़ातील हितवर्धिनी सभागृहात ‘सांधेदुखी, श्वसनविकार आणि पचनविकार परस्पर संबंध आणि उपचार’ या विषयावर आयोजित विनामुल्य व्याख्यानात ते बोलत होते.
चुकीचा आहार-विहार आणि मन:स्थिती यामुळे आजार उद्भवतात. जेवणाची वेळ, सुपथ्य, विरुद्धान्न आणि शिळे अन्न टाळणे या गोष्टी केल्यास शरीराला हमखास आरोग्यच मिळते. ते न केल्यास आजार जीर्ण होऊन आजार शरीरात ठाण मांडून बसतात,’ असे रहाणे यांनी स्पष्ट केले.
‘आपण करत असलेल्या कामाचे स्वरूप तसेच सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या गतिमान दिनक्रमाच्या जीवनशैलीमुळे कोणताही आजार पटकन दूर व्हावा या दृष्टिकोनातून तात्पुरता परिणाम करणाऱ्या औषधांची आपल्याला सवय पडते. अशा औषधांमुळे कोणत्याही आजाराचे कायमस्वरूपी निदान करता येत नाही. आजाराचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी आयुर्वेदाकडे वळण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन डॉ. रहाणेंनी केले.