जनशक्तीच्या बळावर भल्याभल्यांना पराभूत करता येते हे मी अनेकदा सिद्ध करून दाखवले आहे. विधानसभेला कोणीही असू द्या, कराड दक्षिण मतदारसंघ जिंकणे फारच अवघड असून, मला जितके डिवचाल तितके लोकच पेटून उठतील, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी दिला. कराड तालुक्यातील राजकीय आघाडय़ा आपल्याला नव्या नसून, त्या पाचवीलाच पुजल्या आहेत. कार्यकर्त्यांनी त्याची फार काळजी न करता एकजुटीने जनशक्ती वृद्धिंगत करावी असे आवाहन त्यांनी केले.
मलकापूर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व कृषिमित्र अशोकराव थोरात, पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप पाटील, पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. आनंदराव पाटील, अजय शिरवाडकर, यांच्यासह मलकापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या यशवंत विकास आघाडीचे सर्व उमेदवार तसेच स्थानिक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
उंडाळकर म्हणाले, की माझा राजकीय पिंड संघर्षांतून निर्माण झाला असून, संघर्ष हा माझा स्थायिभाव आहे. दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर प्रामाणिकपणे काम करणारा मी शेवटचा कार्यकर्ता आहे. मला मतदार संघातील चार पिढय़ांनी सहकार्य केले. दरम्यान, अनेक चढउतार पाहिले आहेत. मलकापूरच्या निवडणुकीत चढ आला असला तरी उतार लवकरच येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मलकापुरात कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली असून, सेनापतीशिवाय कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्षांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तरी, आता आत्मबळ वाढवून सर्वसामान्यांची नाळ जोडावी असेही आवाहन उंडाळकर यांनी केले.
मलकापुरात काँग्रेसचा हात या मंडळींनी हायजॅक केला. हाताचे चिन्ह घेण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. गत विधानसभा निवडणुकीत ही मंडळी कोठे होती असा सवाल करत काँग्रेसचे तिकीट विलासकाकांना मिळणार नाही. असा संदेश तुम्हाला कोणी दिला. मी काय गोटय़ा खेळतोय, सलग सात वेळा पक्षाचा आमदार आहे. पक्ष सर्वाचा मग आम जनतेचाही आहे. पक्षावर कोणा एकाची मालकी आहे असे कोणी समजू नये असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यकर्त्यांनी माझे उदाहरण डोळय़ासमोर ठेवावे. गेली चाळीस वष्रे मी टिकून आहे. सत्तेसाठी कधी गुलामगिरी पत्करली नाही. जनमानसात प्रतिमा निर्माण करून सामान्यांना बरोबर घेऊन राजकारण केले. याची मला व माझ्या कुटुंबाला फार मोठी किंमत चुकवावी लागली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र, कार्यकर्त्यांनी त्याची करू नये, कार्यकर्त्यांसाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. विधानसभेला फार काही इच्छुक नाही, चांगल्या उमेदवाराच्या शोधात आहे. मात्र, वेळ आली तर कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही. आठव्यांदा मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. आठवं बाळंतपण मला अवघड नाही. असा टोला उंडाळकरांनी लगावला. मी कोणाच्या विरोधात नाही, माझा कोणावर रागही नाही, असूया नाही, मला जितके डिवचाल, तितके कार्यकर्ते पेटतील, माझ बिनभांडवली काम होईल, असाही इशारा उंडाळकरांनी दिला.
अशोकराव थोरात, धनाजी काटकर, राजेंद्र भिसे, मोहनराव शिंदे आदी कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात विलासराव पाटील-उंडाळकरच येत्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार असतील, असा विश्वास देत विरोधकांवर टीकेची झोड उठवली.