News Flash

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना नागरिकांचे साकडे

डोंबिवली शहरातील रिक्षाचालक प्रवाशांसोबत सौजन्याने वागत नाहीत तसेच रिक्षा मीटर पद्धतीचा अवलंब करीत नाहीत, अशा प्रकारांमुळे डोंबिवलीकर हैराण झाले आहेत.

| September 27, 2013 08:40 am

डोंबिवली शहरातील रिक्षाचालक प्रवाशांसोबत सौजन्याने वागत नाहीत तसेच रिक्षा मीटर पद्धतीचा अवलंब करीत नाहीत, अशा प्रकारांमुळे डोंबिवलीकर हैराण झाले आहेत. याच पाश्र्वभूमीवर ‘सक्रिय नागरिक मंच’च्या सदस्यांनी नुकतीच वाहतूक विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये येत्या महिनाभरात वाहतूक समस्येचे प्रश्न सोडविण्यात येतील, रिक्षाचालक-प्रवासी यांच्यामध्ये सुसूत्रता राहील, याविषयी काळजी घेतली जाईल. वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन वाहतूक, आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिले.
डोंबिवली वाहतूक विभागात आयोजित बैठकीला ‘सक्रिय नागरिक मंच’च्या मंत्रालयीन कर्मचारी लता अरगडे, अ‍ॅड. संजय हिंगे, मिलिंद अरोलकर, अ‍ॅड. मीनल वैद्य, एमआयडीसीतील राजू नलावडे, प्रा. उदय कर्वे, वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश पवार, निरीक्षक यादव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनायक गुजराथी व इतर ५० ते ६० जागरूक नागरिक उपस्थित होते.
डोंबिवलीतील वाहतूक समस्या सोडविण्याकडे व रिक्षाचालकांच्या मनमानीकडे वाहतूक, आरटीओ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे अरगडे यांनी सांगितले. मीटर पद्धतीने रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करीत नाहीत. अनधिकृत रिक्षा वाहनतळ जागोजागी निर्माण झाल्याने वाहतूक कोंडीचे चित्र शहरभर दिसत आहे.
शेअर रिक्षा पद्धतीत मागील आसनावर तीन व पुढील आसनावर दोन असे पाच प्रवासी मिळून वाहतूक केली जात आहे. काही जीवघेणा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण, असे प्रश्न नागरिकांनी या वेळी उपस्थित केले. त्या वेळी मीटर पद्धतीचा अवलंब करण्यासाठी रिक्षाचालकांना सक्तीचे केले जाईल. चालकाला गणवेश सक्तीचा, रिक्षाच्या दर्शनी भागात त्याचा बिल्ला क्रमांक, मोबाइल क्रमांक लावण्याची सक्ती केली जाईल, असे वाहतूक, आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच रिक्षाचालकांवर कारवाईसाठी पाऊल उचलले की राजकीय मंडळी पहिले दूरध्वनी करतात. त्यामुळे कारवाई करताना पहिला अडथळा निर्माण होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. डोंबिवलीतील एक राजकीय नेता यामध्ये आघाडीवर असल्याची चर्चा बैठकीत होती. नगरसेवक, आमदार, खासदार आपल्या आगामी निवडणुकीची व्यूहरचना आखण्यात व्यस्त असल्याने त्यांना नागरिकांच्या समस्येचे काहीही देणेघेणे राहिलेले नाही. त्यामुळे या बैठकीतील सूचनांची दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी सक्रिय नागरिक मंचतर्फे अधिकाऱ्यांना करण्यात आली.
प्रवासी वाहतुकीबाबत समस्या असेल नागरिकांनी साध्या टपाल कार्डाने रिक्षाचा क्रमांक, ठिकाण आरटीओ, वाहतूक विभागाला कळवावे किंवा पुढील हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

 

नागरिकांना तक्रारीसाठी नंबर-
आरटीओ – ९९२३८८८२२२.
टोल फ्री –  ९९३३८८८२२२.
वाहतूक –  ९०९६७६६६९६.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2013 8:40 am

Web Title: peoples application towards corporation officers for traffic problems
Next Stories
1 आता चिखलोली स्थानकाचा आग्रह
2 गरब्यासाठी झाडांची कत्तल; गुन्हा दाखल करण्याचे आदेश
3 धोकादायक, अनधिकृत इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश
Just Now!
X