News Flash

बदलापूरकरांची नाटय़गृहाची प्रतीक्षा कधी संपणार?

ठाणे-डोंबिवलीनंतरचे सांस्कृतिक शहर म्हणून बिरुदावली मिरविणाऱ्या बदलापूर शहरामध्ये मनोरंजनासाठी एकही हक्काचे असे ठिकाण नाही. शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात, पण ते एखाद्या शाळेच्या पटांगणांवर नाही

| May 21, 2014 07:07 am

ठाणे-डोंबिवलीनंतरचे सांस्कृतिक शहर म्हणून बिरुदावली मिरविणाऱ्या बदलापूर शहरामध्ये मनोरंजनासाठी एकही हक्काचे असे ठिकाण नाही. शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात, पण ते एखाद्या शाळेच्या पटांगणांवर नाही तर मंगल कार्यालयात. त्यामुळे आवड असूनही अनेक रसिक मंडळी त्याकडे पाठ फिरवतात. गेल्या अनेक वर्षांपासून येथील रसिकांची नाटय़गृहाची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यांची ही साधी मागणी पूर्ण करण्याची इच्छाशक्तीच येथील तथाकथित कार्यसम्राट लोकप्रतिनिधींकडे नाही हेच या दिरंगाईमुळे स्पष्ट होते.
गेल्या काही वर्षांत बदलापूर शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. बैठी घरे, चाळींच्या ठिकाणी आज मोठ-मोठय़ा इमारती उभ्या राहिल्या आहेत. जुलै २००५ नंतरच्या प्रलयंकारी महापुरानंतर बदलापूरचा विकास कुठेतरी खुंटेल, असे वाटले होते. परंतु पूर्वीपेक्षा जास्त जोमाने येथे बांधकामे सुरू आहेत. शहराचा पूर्व भाग तर इमारतींनी व्यापून टाकला आहे. या ठिकाणी राहण्यासाठी आलेल्या नागरिकांना सोयी-सुविधा पुरविण्यात स्थानिक नगरपालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूक असो की नगरपालिका निवडणूक, र्सवच राजकीय पक्षांकडून शहरातील सांस्कृतिक वातावरणाचे गोडवे गायले जातात. तसेच पक्षांच्या जाहीरनाम्यातही नाटय़गृहाचे आश्वासन दिले जाते. परंतु नाटय़गृहासाठी एखादी जागाही अद्याप निश्चित झालेली नाही. बदलापुरातील नाटय़रसिकांना आपली हौस भागविण्यासाठी कल्याण, डोंबिवली, ठाणे तसेच थेट दादर गाठावे लागते. हा द्राविडीप्राणायाम करताना रसिकांची चांगलीच दमछाक होते. त्यात रविवार हा रेल्वेचा मेगाब्लॉकचा दिवस असतो. त्यामुळे रविवारी एखादे नाटक बघावयास बाहेर पडावे तर आणखी हाल, अशी एकंदर परिस्थिती आहे. आजघडीला शहरात एक चित्रपटगृह सोडले तर मनोरंजनासाठी कोणतेही साधन नाही. उपलब्ध आहे ते चित्रपटगृहही ‘मल्टिफ्लेक्स’च्या स्पर्धेत मागे पडले आहे. शहरात नाटय़गृह झाले, तर अंबरनाथ, वांगणी, नेरळ आदी ठिकाणच्या नाटय़रसिकांची चांगली सोय होईल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

गैरसोयींमुळे नापसंती
शहरात पूर्वी मराठी शाळा किंवा आदर्श शाळेच्या मैदानावर नाटके होत होती. गेल्या काही वर्षांपासून येथे नाटक होतच नाहीत. नाटय़गृह नसल्याने चांगली नाटके येथे येण्यास नापसंती दर्शवतात. मैदानात नाटक करताना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. विंग नसणे, सदोष ध्वनियंत्रणा, अपुरी प्रकाश योजना, ड्रेसिंग रूम, मेकअप रूम आदी प्रमुख समस्या जाणवतात, असे या मंडळींचे म्हणणे आहे. शहरात अभिरुची, मृण्मयी, नाटय़शलाका आदी नाटय़संस्था आहेत. ही मंडळी आपपल्या स्तरावर काम करतात. या संस्थांनी राज्यस्तरीय विविध नाटय़स्पर्धामध्ये यश संपादन केले आहे. नाटय़गृह झाले तर स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळेल. दरम्यान, नाटय़गृहबांधणीसाठी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेला निधीची आवश्यकता आहे. त्या संदर्भात संबंधित मंत्रालयाशी पत्रव्यवहार सुरू असून निधी मंजूर झाल्यानंतर साधारण दोन वर्षांत शहरात टुमदार नाटय़गृह उभारण्यात येईल, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष नेहा पातकर यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 7:07 am

Web Title: peoples in badlapur waiting for drama theatre
टॅग : Badlapur,Drama Theatre
Next Stories
1 पाण्याचे दुर्भिक्ष, तरीही दीड कोटींचा निधी वाया
2 इमारतीवरून पडून रहिवाशाचा मृत्यू
3 डावखरे-फाटकांच्या मनसुब्यांना धक्का
Just Now!
X