दिवा रेल्वे स्थानकात जलद गाडय़ांना थांबा देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचा दबाव वाढत असताना उपनगरीय प्रवासी संघटनांनी मात्र ‘अस्सा थांबा नको गं बाई..’, असे म्हणत या कल्पनेला विरोध केला आहे. कल्याण-डोंबिवलीपासून भरून येणाऱ्या जलद गाडय़ांना दिवा स्थानकात थांबा देणे, म्हणजे अपघातांना आमंत्रण देण्यासारखेच आहे, असे मत या प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे. जलद गाडय़ा दिव्यात थांबवण्याऐवजी गर्दीच्या वेळी दिवा स्थानकातून एक-दोन गाडय़ा सोडल्यास त्याचा फायदा मुंब्रा व कळवा येथील प्रवाशांनाही होईल, अशी भूमिका या संघटनांनी घेतली आहे.
जानेवारी महिन्यात दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी अचानक केलेल्या रेल रोको आंदोलनाची दखल घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिवा स्थानकाची पुनर्बाधणी करण्याचे आदेश दिले. हे काम हाती घेण्यात आले असून त्यामुळे दिवा स्थानकात जलद गाडय़ांना थांबा मिळावा, अशी येथील प्रवाशांची अपेक्षा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीही त्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद व एमआरव्हीसीचे संचालक प्रभात सहाय यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत िशदे यांनी या स्थानकाची पाहणी केली होती. त्या वेळीही या स्थानकाच्या पुनर्रचनेचे काम तातडीने पूर्ण करून दिव्यात जलद गाडय़ा थांबवण्याच्या सूचना डॉ. िशदे यांनी केल्या होत्या.याबाबत प्रवासी संघटनांशी बोलले असता, त्यांनी मात्र दिवा स्थानकात जलद गाडय़ा थांबण्यास जोरदार आक्षेप नोंदवला आहे. दिव्यापेक्षा डोंबिवलीची लोकसंख्या आणि तेथील प्रवासी संख्या जास्त आहे. गर्दीच्या वेळी मुंबईकडे जाणारी जलद गाडी डोंबिवली स्थानकातच खच्चाखच भरते. अनेकदा डोंबिवलीतील प्रवाशांनाही या गाडीत पाय ठेवणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत दिवा स्थानकात ही गाडी थांबवून त्याचा लाभ कोणाला होणार आहे, असा प्रश्न उपनगरीय प्रवासी महासंघाच्या महिला प्रतिनिधी लता अरगडे यांनी उपस्थित केला. प्रचंड गर्दी असलेली ही गाडी दिवा स्थानकात शिरल्यानंतर सकाळच्या वेळी येथे उतरणाऱ्यांची संख्या अत्यल्प असेल. त्यामुळे दिवा स्थानकात या गाडीत कोणालाही चढायला मिळणे शक्य होणार नाही. तसा प्रयत्न केल्यास गाडी पकडताना तोल गेल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढेल. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या स्थानकात जलद गाडय़ांना थांबा देणे योग्य नाही, अशी भूमिका या प्रवासी संघटनेने घेतली आहे.
दिवा स्थानकात जलद गाडय़ांना थांबा देण्याऐवजी गर्दीच्या वेळी किमान अध्र्या तासाच्या अंतराने एक दिवा लोकल सोडल्यास या गाडीचा फायदा दिवा तसेच कळवा आणि मुंब्रा येथील प्रवाशांनाही होईल, असे मत या संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी मांडले. दिवा स्थानकापेक्षा कळवा आणि मुंब्रा येथील प्रवाशांची संख्या जास्त आहे. डोंबिवली-दिवा येथून भरून येणाऱ्या धिम्या गाडय़ांमध्ये गर्दीच्या वेळी कळवा आणि मुंब्रा येथे चढणे अशक्य असते. मात्र दिवा लोकल सोडल्यास या स्थानकांमधील प्रवाशांना गाडीत किमान व्यवस्थित चढणे सुलभ होईल, अशी भूमिका देशमुख यांनी मांडली आहे. प्रवाशांसाठी केलेल्या मागणीला प्रवासी संघटनांनीच विरोध केल्याने दिवा स्थानकातील जलद गाडय़ांच्या थांब्याबाबत रेल्वे प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

गर्दीच्या वेळी मुंबईकडे जाणारी जलद गाडी डोंबिवली स्थानकातच खच्चाखच भरते. अनेकदा डोंबिवलीतील प्रवाशांनाही या गाडीत पाय ठेवणे शक्य होत नाही. प्रचंड गर्दी असलेली ही गाडी दिवा स्थानकात शिरल्यानंतर सकाळच्या वेळी येथे उतरणाऱ्यांची संख्या अत्यल्प असेल. त्यामुळे दिवा स्थानकात या गाडीत कोणालाही चढायला मिळणे शक्य होणार नाही. तसा प्रयत्न केल्यास गाडी पकडताना तोल गेल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढेल. दिवा स्थानकात जलद गाडय़ांना थांबा देण्याऐवजी गर्दीच्या वेळी किमान अध्र्या तासाच्या अंतराने एक दिवा लोकल सोडल्यास या गाडीचा फायदा दिवा तसेच कळवा आणि मुंब्रा येथील प्रवाशांनाही होईल.