मतदानाचा पारंपरिक साचा बदलू लगल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एका सर्वेक्षणानुसार सुशिक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठीही सुशिक्षित मतदार मोठय़ा प्रमाणावर बुधवारी मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे मतदानासाठी अपंग मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून मतदानासाठी न उतरणाऱ्या मतदारांच्या डोळ्यांत अंजन घातल्याचे दिसून आले.
नवी मुंबईतील दोन मतदारसंघात बुधवारी सकाळपासून धीम्यागतीने मतदानाला सुरुवात झाली. त्यामुळे दुपापर्यंत बेलापूर मतदारसंघात २४ आणि ऐरोली मतदारसंघात १७ टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मात्र अचानक मतदान वाढल्याचे दिसून आले. ही वाढलेली टक्केवारी फक्त तरुणाईची नसून मध्यमवर्गीय मध्यमवयीन सुशिक्षित मतदारांचा त्यात भरणा असल्याचे लक्षात आहे. अनेक आलिशान गाडय़ा मतदार केंद्रांच्या १०० मीटर अंतराच्या बाहेर उभ्या राहत होत्या. त्यामुळे सुशिक्षित आणि उच्चभ्रू मतदार मतदानासाठी उतरल्याचे दिसून आले. नवी मुंबईत विकासाचा मुद्दा घेऊन गणेश नाईक व त्यांचे चिरंजीव संदीप नाईक निवडणूक िरगणात दुसऱ्यांदा उतरले होते. त्याविरोधात प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेच्या विजय नाहटा व विजय चौगुले यांनी घराणेशाहीचा मुद्दा महत्त्वाचा केला होता. सुशिक्षित मतदाराचा कल त्यामुळे कुठे आहे ते येत्या रविवारी स्पष्ट होणार आहे. टाटा कन्सल्टन्सीने सिडकोसाठी मध्यंतरी केलेल्या एका सर्वेक्षणात या शहरात ९६ टक्केसुशिक्षित नागरिक असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. या मतदारसंघात आजवर केवळ ५० टक्क्यांच्या आतच मतदान झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या वेळी मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवी मुंबईत पंचरंगी निवडणूक नावाला असून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी दुरंगी निवडणूक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपचे वैभव नाईक, मंदा म्हात्रे, काँग्रेसचे नामदेव भगत, रमाकांत म्हात्रे, मनसेचे गजानन काळे, गजानन खबाळे यांची चुरस केवळ तिसऱ्या क्रमांकासाठी राहणार आहे. सुशिक्षित मतदार मतदानासाठी मैदानात उतरल्याचे चित्र असताना कोपरखैरणे येतील मतदारसंघात काही अपंगांनी रांगेत उभे राहून केलेले मतदान अनेकांच्या डोळ्यांत अंजन घालणारे होते. नवी मुंबईतील ग्रामीण भागातील महिलांनी सकाळी लवकर मतदान केल्याचे दिसून येत होते. यात वयोवृद्ध महिलांचाही समावेश मोठा होता.

नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणात असलेला माथाडी मतदार मंगळवारी रात्री साताऱ्याकडे रवाना झाल्याने कोपरखैरणे भागात मतदानाच्या दिवशी अक्षरश: शुकशुकाट होता. माथाडी कामगार संघटनेचे नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासाठी हा मतदार गेल्याने त्याचा फटका राष्ट्रवादीचे संदीप नाईक यांना बसणार असल्याचे दिसून येते. मंगळवारी ४० बसेस पश्चिम महाराष्ट्रात गेलेल्या आहेत.