प्रजासत्ताकदिनाच्या मुख्य शासकीय ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरू होता. या दरम्यान रतन चंदन शेलार (वय ४०), प्रमोद रामहरि कांबळे (१९), संतोष शंकरराव पवार (वय ३२), आनंद बाबुराव चांदणे (वय ३२) व प्रकाश विठ्ठल शेजवळ (२५, सर्व औरंगाबाद) यांनी कार्यक्रमात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरू असताना हा प्रकार घडला. या वेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी त्यांची झटापट झाली. पोलिसांनी या सर्वाना ताब्यात घेतले. शासकीय कामात अडथळा आणला व राष्ट्रीय ध्वजाची व संविधानाची अप्रतिष्ठा केली, यावरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात या आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.