बेमुदत उपोषणाच्या माध्यमातून पालकमंत्री संजय देवतळे यांना अडचणीत आणण्याचा नरेश पुगलियांचा प्रयत्न अखेर यशस्वी होऊ शकला नाही. यातून ते केवळ राजकीय ताकत दाखवून देऊ शकले. त्यामुळे आठवडाभर गाजलेले त्यांचे हे उपोषण प्रायश्चित्त होते की पश्चाताप, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
गेला आठवडा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्या बेमुदत उपोषणाने गाजला. आजवर कार्यकर्त्यांना उपोषणाला बसवून सरकारवर दबाव आणणाऱ्या पुगलियांवर यावेळी स्वत:च उपोषणावर बसण्याची वेळ आली. सलग दोन पराभवांमुळे घसरत चाललेली राजकीय पत सुधारण्यासाठी त्यांना हा शेवटचा मार्ग स्वीकारावा लागला. सामान्य जनतेच्या मागण्यांसाठी आपण हे उपोषण करीत आहोत, असा दावा पुगलियांनी केला असला तरी त्यांचा या आंदोलनामागील हेतू पूर्णपणे राजकीय होता, हे लपून राहिलेले नाही. राज्यात व केंद्रात स्वत:च्या पक्षाचे सरकार असताना मुंबई व दिल्लीत जाऊन धडक मारण्याऐवजी पुगलियांनी जनतेसमोर जाणे पसंत केले. या उपोषणाच्या आडून त्यांनी पालकमंत्री संजय देवतळे व जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांना लक्ष्य केले होते. या दोघांच्या निष्क्रियतेमुळे विकास थांबला, असा त्यांचा सूर होता. जनतेचे प्रश्न समोर करून आंदोलनाच्या माध्यमातून विरोधकांना अडचणीत आणण्याची पुगलियांची खेळी होती. प्रत्यक्षात त्यांची ही खेळी यशस्वी होऊ शकली नाही.
पालकमंत्री देवतळे यांनी आरंभापासून या उपोषणावर मौन बाळगले. पुगलियांनी निवडलेला उपोषणाचा मार्ग व देवतळेंनी बाळगलेले मौन या दोन्ही गोष्टी महात्मा गांधींच्या सत्याग्रहात समाविष्ट आहेत. त्यामुळे गांधींचे कोणते हत्यार यशस्वी होते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. प्रारंभी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या उपोषणाची दखलच घेतली नाही. दिल्लीतील श्रेष्ठींनी सूचना दिल्यानंतर त्यांनी दोन मंत्र्यांना पाठवून आंदोलन संपवले. या साऱ्या प्रकरणात मौन बाळगलेले देवतळे नशिबवान ठरले. चव्हाणांचा वरद्हस्त जोवर पाठीवर आहे तोवर मंत्रीपदाला धोका नाही, याची प्रचिती पुन्हा एकदा देवतळेंना आली, ही वस्तुस्थिती पुगलियांच्या लक्षात आली नाही, अशातला भाग नाही. तरीही त्यांना उपोषण करावे लागले. राज्याचे दोन मंत्री विशेष विमानाने येथे येऊन उपोषण सोडवतात, यातून दिसलेली राजकीय ताकत हीच या उपोषणाची पुण्याई ठरली.
देवतळेंशिवाय इतर कुणाचेही न ऐकणारे जिल्हाधिकारी विजय वाघमारे सुद्धा पुगलियांच्या रडारवर होते. त्यांच्या वाटय़ाला मात्र शेवटी जाहीर अपमान आला. अधिकाऱ्यांच्या झोळीत असे अपमानाचे दान नेहमी पडत असते. त्यामुळे वाघमारे विचलित झालेले दिसले नाहीत. पुगलियांनी या उपोषणाला दिलेले प्रायश्चित्त, असे नाव मात्र अनेकांना खटकले. त्यांना नेमके कोणते प्रायश्चित्त घ्यायचे आहे, असा प्रश्न अनेकांना पडला. महापालिका निवडणुकीत जनतेला दिलेला विकासाचा शब्द पाळू शकलो नाही, याचे की देवतळेंचे नाव मंत्रीपदासाठी सुचवून आपण चूक केली, याचे प्रायश्चित्त, असा प्रश्न अनेकांना पडला. प्रयत्नांचे सर्व मार्ग खुंटले की प्रायश्चित्त घेण्याची वेळ येते. या प्रकरणात प्रयत्नांच्या आधीच पुगलियांनी प्रायश्चित्ताचा प्याला जवळ केला. देवतळेंना मंत्रीपदासाठी हिरवी झेंडी देणे व नंतर हळहळत बसणे, हा प्रायश्चित्तात नाही तर आता पश्चातापात मोडणारा प्रकार ठरतो. झालेल्या चुकीवर पश्चाताप व्यक्त करण्याची पाळी पुगलियांसारख्या दमदार नेत्यावर यावी, याचेही अनेकांना वाईट वाटले. या उपोषणाच्या निमित्ताने वैद्यकीय महाविद्यालय नेमके कुठे व्हावे हा सुद्धा आंदोलनाचा विषय होऊ शकतो, हेही जिल्ह्य़ातील जनतेला पहिल्यांदाच कळले.