घर बांधण्यासाठी व शेत घेण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत, यासाठी सासरी विवाहितांचे छळ करण्यात आल्याच्या दोन घटनांप्रकरणी पोलिसांनी १५जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. वाळूज व मुकुंदवाडी पोलिसांनी हे गुन्हे नोंदविले.
घर बांधण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणावेत, म्हणून मुमताज शेख महेबूब (वय २१, कमलापूर, तालुका गंगापूर) हिचा सासरी मारहाण व धमक्या देऊन शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. मुमताजने पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून तिचा पती शेख महेबूब शेख रऊफ, शेख रऊफ, नसीमा, परवीन, अतीक, रफिक व मीना बेगम (खासबाग, जिल्हा बीड) या सातजणांविरुद्ध वाळूज पोलिसांनी गुन्हय़ाची नोंद केली. दुसरी फिर्याद शहराच्या गारखेडा परिसरातील आनंदनगर येथील दिशा महाऋषी नाथभजन (वय २२) हिने दिली.
शेत घेण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये घेऊन ये, असे म्हणून सासरी तिला मानसिक व शारीरिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मुकुंदवाडी पोलिसांनी तिचा पती महाऋषी सीताराम नाथभजन, सीताराम गणपत नाथभजन, राधाकिसन सीताराम नाथभजन, सावित्रीबाई गोरख कांबळे, वत्सलाबाई सीताराम नाथभजन, लक्ष्मीबाई उत्तम कांबळे, गौतम उत्तम काळे व अनिता राधाकिसन नाथभजन (आनंदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.