खांदेश्वर परिसरात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या सुरेंद्रकुमार शुक्ला याला रविवारी नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून तीन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह सहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहेत. पनेवल तालुक्यातील शिरवली गावातील हत्याकांडातील आरोपीला पिस्तूल पुरविल्याप्रकरणी शुक्ला याला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी शिक्षा भोगत असलेला शुक्ला हा काही महिन्यांपूर्वी पॅरोलवर बाहेर आला होता.
पनेवल तालुक्यातील शिरवली गावातील पाटील फार्म हाऊसवर दोन वर्षांपूर्वी पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली चंद्रकांत वाघमारे या भोंदूबाबाने चार इस्टेट एजंट्सची गोळ्या झाडून तसेच दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली होती.
या गुन्ह्य़ात वापरण्यात आलेले पिस्तूल वाघमारे याला शुक्ला याने पुरवले असल्याचे तपासात समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात शिक्षा भोगत असताना दोन महिन्यांपूर्वी पॅरोलवर कारागृहातून बाहेर आल्यावर शुक्ला याने शस्त्रविक्रीचा धंदा पुन्हा सुरू केला होता.
खांदेश्वर परिसरात पिस्तूल विक्रीसाठी एक जण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील बाजारे, कृष्णाजी कोंकणे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष शिंदे यांच्या पथकाने या परिसरात सापळा रचला होता. त्या ठिकाणी शुक्ला आला असताना बाजारे यांनी त्याला ओळखले. त्याला थांबण्याचा इशारा केला असताना पळ काढत असताना शिंदे यांनी त्याला रोखले.
या वेळी त्याने शिंदे यांच्यावर पिस्तूल रोखले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखत शिंदे यांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून शुक्ला याच्या पायाजवळ दोन गोळ्या झाडल्या. यामुळे भेदरलेल्या शुक्लाला पळत असताना पोलीस हवालदार किरण राऊत, संजय कदम, आशीष म्हात्रे आणि निकम यांनी त्याचा पाठलाग करीत जेरबंद केले.