03 August 2020

News Flash

जिल्हा बँकेच्या नाकर्तेपणामुळे व्यक्तिगत सभासदांना भरुदड

वार्षिक सर्वसाधारण सभेत भागभांडवल मर्यादा वाढविण्याची सक्ती करू नये या स्वरुपाच्या सर्वानुमते मंजुर झालेल्या ठरावाची नोंद न घेता

| January 3, 2015 12:08 pm

वार्षिक सर्वसाधारण सभेत भागभांडवल मर्यादा वाढविण्याची सक्ती करू नये या स्वरुपाच्या सर्वानुमते मंजुर झालेल्या ठरावाची नोंद न घेता मतदानाचा अधिकार नाकारण्याची तंबी देत व्यक्तिगत सभासदांवर किमान पाच हजाराच्या भागभांडवलाचा भार टाकणाऱ्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकांची चौकशी करून त्यांच्याविरूध्द कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संजय माळी यांनी केली आहे. भागभांडवलाची वाढीव मर्यादा पुर्ण न करणाऱ्या सभासदांना मतदानाचा अधिकार नाकारू नये, असा आग्रह देखील त्यांनी धरला आहे.
या संदर्भात सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन माळी यांनी त्यांना सविस्तर लेखी निवेदन दिले. बँकेच्या व्यक्तिगत सभासदांवर होणारा हा अन्याय दूर करावा अशी मागणी केली आहे. सहकार खात्याच्या घटना दुरूस्तीनुसार व्यक्तिगत सभासदांचे भागभांडवल किमान पाच हजार करण्या संदर्भातील ठराव गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चर्चेला आला होता. त्यास अनेक सभासदांनी कडाडून विरोध दर्शविला. त्यावेळी आपण स्वत: भागभांडवल मर्यादा वाढविण्याची सक्ती करू नये अशा आशयाचा ठराव मांडल्यावर उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात त्यास मान्यता दिली होती असा दावा माळी यांनी निवेदनात केला आहे.
प्रशासकांनी या ठरावाची इतिवृत्तात नोंद घेण्यात येईल व सहकार आयुक्तांच्या मान्यतेसाठी तो पाठविण्यात येईल अशी ग्वाही सभेत दिल्याने सभासद निश्चिंत असतांना बँकेच्यावतीने अलीकडेच व्यक्तिगत सभासदांना पत्र पाठवून पाच हजारापर्यंत भागभांडवल जमा करण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे. पाच हजार रुपयांच्या मर्यादेत भागसंख्या वाढविली गेली नाही तर बँकेच्या आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क असणार नाही अशी तंबी या पत्रात देण्यात आली आहे. त्यामुळे बँक स्थापनेच्या वेळी पै-पै जमा करून भांडवल उभे करण्यासाठी योगदान देणाऱ्या गरीब शेतकऱ्यांवर मोठा अन्याय असल्याची भावना माळी यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही वर्षांत नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आर्थिक खाईत सापडला आहे. त्याला कुटुंबाची गुजराण करणे अवघड झाले आहे. अशा स्थितीत भागभांडवल वाढविण्यासाठी हा भार पेलणे शक्य नसल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2015 12:08 pm

Web Title: personal members suffer loss due to district bank incompetence
Next Stories
1 गोदावरी प्रदूषणमुक्तीस प्राधान्य
2 पोलिसांच्या जाळ्यात ३१ तळीराम
3 नाशिक जिल्ह्यात हलक्या सरी
Just Now!
X