विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होणार असल्याने सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीने तत्पुर्वी हातपाय मारण्याची संधी न दवडण्याची धडपड चालविली आहे. ज्या ठिकाणी पर्जन्याचे प्रमाण कमी आहे, अशा १२३ तालुक्यांत टंचाईसदृश्य स्थिती जाहीर केल्यानंतर आता त्यांची कक्षा आणखी १५ नव्या तालुक्यांचा समावेश करून विस्तारली गेली आहे. नव्या यादीत नाशिक जिल्ह्यातील पेठ व चांदवड तालुक्यांचा समावेश आहे. पहिली यादी जाहीर करताना काँग्रेसच्या ताब्यातील तालुके वंचित राहिले होते. त्याची कसर चांदवडच्या समावेशाने काहीशी भरून निघाली असली तरी सिन्नरला मात्र डावलले गेले आहे.
ज्या भागात ५० टक्क्यांहून कमी प्रमाणात र्पजन्यमान झाले आहे, त्या ठिकाणी शासनाने आधीच टंचाई सदृश्य स्थिती जाहीर करून विशेष सवलती लागू केल्या आहेत. या अनुषंगाने संबंधित तालुक्यांना कृषी वीज देयकात ३३ टक्के सवलत, शेतसारा माफी व शालेय विद्यार्थ्यांना शुल्कमाफी या सवलती मिळणार आहे. नाशिकनध्ये गावांची निवड करताना गतवेळी ५० टक्क्यांहून कमी पाऊस झालेले व प्रामुख्याने काँग्रेसच्या ताब्यातील तालुके वगळले गेल्याची अनेकांची भावना होती.
पालकमंत्री छगन भुजबळ यांचा येवला तालुका, आ. पंकज भुजबळ यांचा नांदगाव यांच्यासह मालेगाव व देवळा या चार तालुक्यांचा पहिल्या यादीत समावेश आहे. याबद्दल ओरड झाल्यावर शासनाने पुन्हा दुसरी यादी जाहीर केली. पण, त्यातही दुष्काळाच्या खाईत सापडलेले तालुके पूर्णपणे समाविष्ट होऊ शकले नाहीत. नव्या यादीत काँग्रेसच्या सहयोगी सदस्यांचा चांदवड तर राष्ट्रवादीच्या अधिपत्याखालील पेठ तालुक्याचा समावेश आहे.
काँग्रेसचे आ. माणिक कोकाटे यांच्या सिन्नर तालुक्याचा मात्र या यादीत समावेश झालेला नाही. नवीन यादी तयार होईपर्यंत या तालुक्यात सरासरीच्या ५० टक्क्यांपर्यंत र्पयन्यमान झाले होते. पेठ तालुक्यातही तिच स्थिती होती.
आता या दोन्ही तालुक्यांचे र्पजन्यमान ५४ टक्के असले तरी सिन्नरचा विचार झाला नाही. या तालुक्यात सध्या सर्वाधिक म्हणजे २४ गावे व २०४ वाडय़ांमध्ये ४५ टँकरने पाणी पुरविले जात आहे. पावसाळ्याचा हंगाम संपुष्टात येण्यास महिनाभराचा अवधी शिल्लक असताना जिल्ह्यात ८९ गावे
व ३०६ वाडय़ांना ९३ टँकरने पाणी पुरविले जात आहे.

शहरात कुठे मुसळधार तर कुठे अत्यल्प
नाशिक शहरात पावसाचा लपंडाव सुरू असून एखाद्या भागात काही मिनिटे जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाचा दुसऱ्या भागात मागमुसही दिसत नाही. मंगळवारी दुपारी कॉलेजरोड, गंगापूर रोड व सातपूर औद्योगिक वसाहतीत काही काळ जोरदार पाऊस झाला. याच सुमारास द्वारका, नाशिकरोड या भागात पावसाचा थेंबही पडला नाही. आदल्या दिवशीही पावसाचा असाच लपंडाव पहावयास मिळाला. पंचवटीतील अमृतधाम परिसरात अर्धा ते पाऊण तास पाऊस कोसळत होता. पण, शहरातील इतर भागात त्याचे स्वरुप रिमझिम होते. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात ९०२५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी हेच प्रमाण १२७६४ मिलीमीटर होते. दोन्ही वर्षांची तुलना केल्यास गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण ३७३९ मिलीमीटरने कमी झाले आहे.