इंधनावर आकारल्या जाणाऱ्या स्थानिक संस्था करात कपात करण्यात आल्याने पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील, अशी आशा बाळगणाऱ्या ठाणे, नवी मुंबईकरांचा भ्रमाचा भोपळा अखेर फुटला असून मुंबई तसेच नवी मुंबईपल्याडच्या शहरांच्या तुलनेत प्रती लिटरमागे दोन ते तीन रुपयांनी महाग इंधन विकत घ्यावे लागत असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र अशी नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
   नव्या दर पत्रकानुसार नवी मुंबईतील पेट्रोल-डिझेलचे दर मुंबई, ठाण्याच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. स्थानिक संस्था कर अस्तित्वात येण्यापूर्वी नवी मुंबई महापालिका स्थानिक इंधन विक्रेत्यांना उपकर आकारत असे. इंधनावरील उपकराचा दर एक टक्का असा होता. स्थानिक संस्था कर लागू होताच तो दोन टक्क्य़ांवर पोहचला आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारमार्फत इंधनाच्या निर्यातीवर आकारला जाणारा ०.२० टक्के इतका निर्यात स्थानिक संस्था कर नवी मुंबईकरांच्या माथी मारला जात आहे. त्यामुळे वर्षांनुवर्षे मुंबई, ठाण्यापेक्षा स्वस्त इंधनाची चैन करणाऱ्या नवी मुंबईकरांना सध्या या शहरांच्या तुलनेत महागडे इंधन विकत घ्यावे लागत आहे.
जकात स्वस्त केल्यामुळे जेमतेम चार महिन्यांसाठी स्वस्त पेट्रोल-डिझेलची चैन अनुभवणाऱ्या ठाणेकरांनाही मुंबईच्या तुलनेत महागडे इंधन विकत घ्यावे लागत आहे. नवी मुंबईकरांच्या तुलनेत ते स्वस्त आहे इतकेच काय ते ठाणेकरांसाठी समाधान.
राज्य सरकारने लागू केलेल्या स्थानिक संस्था कराच्या दरसूचीत सुरुवातीला इंधनावर ३.५० टक्के इतका कर आकारण्यात आला होता. त्यामुळे ठाणे, नवी मुंबईतील इंधनाचे दर इतर शहरांच्या तुलनेत मोठय़ा प्रमाणावर वाढले होते. याविषयी नागरिकांकडून नाराजीचे सूर व्यक्त होताच खडबडून जागे झालेल्या ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेने सुधारित दराचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला. ठाण्यात यापूर्वी इंधनावर चार टक्के इतकी जकात आकारली जात असे. त्यामुळे ठाणेकरांना वर्षांनुवर्षे महाग इंधन विकत घ्यावे लागले.
त्यामध्ये सुधारणा करत महापालिकेने हे दर ०.५० टक्क्य़ांपर्यंत कमी केले. त्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्यामुळे ठाणेकरांना काही काळ स्वस्त इंधनाची मौज लुटता आली होती. स्थानिक संस्था कर लागू होताच सुरुवातीला ३.५० टक्के इतका दर आकारला गेल्यामुळे ठाणे, नवी मुंबईतील पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग झाले. या शहरांमधील महापालिकांनी सुधारित दरांचा प्रस्ताव सरकारकडे पाठविल्यानंतर दोन आठवडय़ांपूर्वी सरकारने इंधनावरील कर ३.५० वरून दोन टक्यांपर्यंत खाली आणले. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर काही प्रमाणात कमी झाले असले तरी नवी मुंबईकतील पेट्रोल पंप चालकांवर लादल्या गेलेल्या इतर करांमुळे मुंबई, ठाण्याच्या तुलनेत नवी मुंबईत विकले जाणारे पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे.

करांचे ओझे कायम
नवी मुंबईतील पेट्रोलपंप चालकांना यापूर्वी इंधन खरेदीवर एक टक्का इतका उपकर आकारला जात होता. स्थानिक संस्था कराचे दर सरकारने कमी केले असले तरी उपकराच्या तुलनेत ते एक टक्क्य़ाने अधिक आहेत, अशी माहिती बीपीसीएल कंपनीचे वितरक अजित कांडपिळे यांनी वृत्तान्तला दिली. त्यामुळे स्थानिक संस्था कर लागू होताच नवी मुंबईतील पेट्रोल-डिझेल महागले आहे, असे कांडपिळे यांनी स्पष्ट केले. नवी मुंबईत इंधन विक्री करणाऱ्या मोठय़ा कंपन्यांची डेपो आहेत. या डेपोतून पुणे, नाशिक तसेच आसपासच्या शहरांना निर्यात होणाऱ्या इंधनावरील ०.२० टक्के इतका निर्यात कर राज्य सरकार स्थानिक संस्था कराच्या तुलनेत आकारते. हा कर स्थानिक पेट्रोलपंप चालकांकडून वसूल केला जात आहे. त्याचा अतिरिक्त भार नवी मुंबईतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर पडत आहे, असे बीपीसीएलचे वितरक विवेक िशदे यांनी स्पष्ट केले. याशिवाय पेट्रोलवर एक टक्का तर डिझेलवर तीन टक्के असा व्हॅट कर मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून वसूल केला जातो. त्याचा भार पडतो तो वेगळाच, असेही िशदे यांनी स्पष्ट केले.

तुलनात्मक तक्ता..
१ ऑगस्ट २०१३ नंतरचे दरपत्रक
  इंधन          नवी मुंबई            खारघर-पनवेल             मुंबई           ठाणे शहर
  पेट्रोल         ७९.९०                ७६.९० (- ३.००)      ७८.६१ (१.२९)      ७९.४३ (०.४७)
डिझेल        ६०.९४                ५६.६१ (-४.३३)       ५८.२३ (-२.७१)     ५९.४१ (-१.५३)