जिल्ह्य़ात विविध जलाशयांतील गाळ काढण्याच्या यंत्रणेसाठी जिल्हा नियोजन मंडळांतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून वाहनांसाठी इंधनपुरवठा केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार जयवंत आवळे, आमदार अमित देशमुख व वैजनाथ शिंदे, अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, महापौर स्मिता खानापुरे, जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा, पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर उपस्थित होते. जिल्ह्य़ात सध्या पाण्याचा एकही टँकर चालू नसला, तरी भविष्यकाळात पाणीटंचाईची अडचण लक्षात घेऊन योजना आखण्यात आल्या आहेत. पाणीटंचाईसाठी १७ कोटी निधी उपलब्ध केला आहे. एखाद्या गावातून पाण्यासाठी विंधनविहिरीची मागणी झाल्यास प्रशासनाने ४८ तासांत त्याविषयी निर्णय घेतला पाहिजे, असे आदेश दिले आहेत. जिल्ह्य़ात ३७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. जिल्ह्य़ातील पाणीसाठे केवळ पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. या पाण्याचे संरक्षण करण्यासाठी २४ तास जागता पहारा देण्याचे आदेशही बजावले आहेत.