कल्याणमधील लालचौकी येथील वासुदेव बळवंत फडके मैदानात तालुका क्रीडासंकुल उभारणीच्या कामाचा प्रस्ताव निधी उपलब्ध असतानाही महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे धूळ खात पडला आहे. यामुळे शहरातील क्रीडाप्रेमी खेळाडू, नागरिकांकडून तीव्र  प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
फडके मैदानात तालुका क्रीडासंकुल विकसित करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार प्रकाश भोईर यांनी १५ लाख रुपयांचा निधी यापूर्वीच उपलब्ध करून दिला आहे. काँग्रेसचे खासदार सुरेश टावरे यांनी २५ लाख रुपये तर भाजपचे आमदार रामनाथ मोते यांनी आमदार फंडातून या क्रीडासंकुलासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.  शासनाने पावणे दोन कोटीचा निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे निधी उपलब्ध असतानाही क्रीडासंकुलाचा प्रश्न कशासाठी भिजत पडला आहे, असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.  महापौर वैजयंती गुजर यांच्या उपस्थितीत क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन उरकण्यात आले आहे. या क्रीडासंकुलात खेळाडूंना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  महापालिकेच्या क्रीडा विभागातील विनय कुलकर्णी याबाबत आपण प्रशासकीय काम पाहतो, असे सांगून क्रीडा अधिकारी राजेश भगत यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. पण, प्रतिक्रियेसाठी राजेश भगत उपलब्ध झाले नाहीत.