गेल्या ४०० वर्षांत अगणित लोकसंख्या वाढली. तसेच पाणी व जमीन यांचा बेसुमार वापर झाला. मूठभरांच्या चंगळवादामुळे ७० टक्के जनतेची उपेक्षा होऊन नैसर्गिक साधनसंपत्तीचा अमर्याद वापर होत राहिला. त्यामुळे पृथ्वी विनाशाच्या उंबरठय़ावर आहे, असे परखड विश्लेषण अमेरिकेतील प्रसिद्ध विचारवंत मार्क लिंडले यांनी येथे केले.
काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात लिंडले यांचे ‘जगापुढील आव्हाने व पर्यायी जग’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी चित्रकार राजानंद सुरडकर यांच्या ‘जागतिक दहशतवाद आणि बुद्ध’ या चित्राचे अनावरण करण्यात आले. लिंडले यांनी सांगितले, की जगातील सात अब्जांपैकी सुमारे एक कोटी जनता अतिशय सुखासीन, चैनीचे जीवन जगत आहे. अमेरिकेतील एक टक्का, तर भारतात २० टक्के लोकांकडे त्या त्या देशांची संपत्ती एकवटली आहे. वसुंधरा अधिवेशनात जीवनशैली बदलण्यास अमेरिकन अध्यक्षांनी नकार देऊन जगाला संकटात टाकले आहे. पर्यावरणाच्या प्रश्नावर तसेच जागतिक उत्तरदायित्वाची संधी अमेरिकेने गमावली आहे. अमेरिकेच्या चंगळवादाचे मॉडेल आदर्श मानून भारत व चीनमधील नवश्रीमंत वर्ग नैसर्गिक साधनसंपत्तीचा ओरबाडून उपभोग घेत आहे. त्यातून श्रीमंत व वंचितांमध्ये तणाव निर्माण होत आहे. त्याची परिणती दहशतवाद फोफावण्यात होत आहे. जागतिक तापमानवाढीचा धोकाही वाढला आहे, याकडे लिंडले यांनी लक्ष वेधले. लिंडले यांच्या भाषणाचा प्रा. एच. एम. देसरडा यांनी स्वैर अनुवाद केला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धनराज माने यांचेही भाषण झाले. आजचा समाज स्वार्थाध होऊन सुखाच्या मागे धावत आहे. मात्र, या ध्यासातून, हव्यासातून दु:ख निर्माण होत आहे. त्यामुळे गरजा मर्यादित ठेवण्याची गरज त्यांनी सांगितले.
पंचायत राज संघटनेचे राज्य सरचिटणीस मिलिंद पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक न्याय, समता, बंधुता ही मूल्ये, तसेच नेहरूचा समाजवाद न स्वीकारल्याने भांडवलशाही, मनुवादी शक्ती प्रबळ झाल्याचे नमूद केले. रवींद्र तौर, आमदार एम. एम. शेख, माजी आमदार किशोर पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब थोरात, कार्याध्यक्ष राजेश मानकर उपस्थित होते. जमील अहमद खान यांनी सूत्रसंचालन केले.