निरभ्र आकाशातून पावसाचा एखादा थेंब अवचित येईल आणि रानमाळं कसे हिरवेगार होईल या वेडय़ा आशेने आकाशाकडे डोळे लावून बसलेले शेतकरी.. ओंजळीभर पाण्यासाठी मैलोनमैल चालणारी चिमुकली पाऊले.. पानगळीच्या बहरात देखील फळांनी लगडलेले एखादे झाड..
‘पाणी. द स्टोरी ऑफ वॉटर’ या छायाचित्र प्रदर्शनातील ही काही प्रातिनिधीक उदाहरणे. दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या भीषण वास्तवाचे वेगवेगळे पदर उलगडून दाखविण्याच्या उद्देशाने ठाणे येथील अर्थ फाऊंडेशन आणि फोटो सर्कल सोसायटी यांच्यातर्फे १ व २ जून या कालावधीत नाशिक येथे या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारकात हे प्रदर्शन होणार असल्याची माहिती फाऊंडेशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. माधवी नाईक यांनी दिली. प्रदर्शनाचे उद्घाटन १ जून रोजी सकाळी दहा वाजता क. का. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते होणार आहे. सलग दोन दिवस सकाळी १० ते रात्री ८.३० या कालावधीत प्रदर्शन सर्वासाठी खुले राहील. सध्या
राज्यातील बहुतांश भाग दुष्काळाला सामोरा जात आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या पाश्र्वभूमीवर, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व संघटनांकडून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मदत कार्य सुरू असताना त्याची फारशी जनजागृती होत नसल्याचे लक्षात घेऊन अर्थ फाऊंडेशन आणि फोटो सर्कलने या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याचे अ‍ॅड. नाईक यांनी नमूद केले. सांगली, सातारा, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, जालना, बुलढाणा, औरंगाबाद, अहमदनगर व ठाणे ग्रामीण परिसरात त्यासाठी दौरे करण्यात आले. तेथील शेतक ऱ्यांची परिस्थिती, महिला-मुलींची पाण्यासाठी होणारी वणवण, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, उन्हामुळे करपलेली पिके आदींचा छायाचित्रांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला आहे.
ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असताना दुसरीकडे शहरी भागात मात्र मोटारगाडय़ा धुण्यासाठी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय केला जात आहे. पाण्याचा मुक्त हस्ते होणारा वापर पाहता, आजच्या पिढीवर पाणी बचतीचे संस्कार होणे गरजेचे आहे. ही संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन प्रदर्शनात २००-२५० छायाचित्रांच्या माध्यमातून प्रबोधन केले जाणार आहे. यासाठी फोटो सर्कलचे अध्यक्ष प्रवीण देशपांडे, संजय नाईक व अर्थच्या माधवी नाईक यांनी परिश्रम घेतले. आधी हे प्रदर्शन ठाणे येथे झाले असून पुढील महिन्यात ते मुंबईमध्ये होणार आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसाठी निधी संकलनाचे कामही केले जात असल्याचे नाईक यांनी सांगितले. या संदर्भात अधिक माहितीसाठी ९८२०३ २९८७९, ९७०२५ ८५८५८५ या        क्रमांकावर संपर्क साधावा.