सभोवताली सातत्याने काही ना काही घडत असते. त्यातील काही गोष्टी आपल्याही नकळत नजरेत कैद होतात. मग ते सभोवतलाच्या गर्दीवर रुसून आईच्या पदराआड बसलेले मूल असो वा भर उन्हात शाळेच्या दरवाज्याजवळ ताटकळत असलेले आजोबा असो.. लग्न सोहळ्यात छायाचित्र काढताना चालणाऱ्या खाणाखुणा असोत.. असे काही निवडक क्षण आपल्या भ्रमणध्वनीच्या कॅमेऱ्यात बंदीस्त करण्याचा मोह सर्वानाच होतो. कॅमेऱ्यातील या निवडक क्षणांचा नजराणा ‘बोलका सेल’ या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून छायाचित्रकार किरण तांबट उलगडणार आहेत. १६ ते १८ मे या कालावधीत हे प्रदर्शन होणार आहे.
गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारक येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता छायाचित्रकार प्रसाद पवार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. विविध कॅमेरे लिलया हाताळणारे तांबट यांनी मुलीच्या आग्रहास्तव ‘अ‍ॅड्राईड’ फोन घेतला. त्यात काढलेले छायाचित्र फेसबुकवर टाकले. या छायाचित्राला मिळालेल्या प्रतिक्रियेतून ‘मोबाईल पिक्चर सिरीज’चा विचार त्यांच्या मनात डोकावला आणि त्यातून ‘बोलका सेल’चे वेध लागले. आजवर भ्रमणध्वनीच्या माध्यमातून त्यांनी सात-आठ हजार छायाचित्र काढले. त्यातील निवडक अशा दीडशे छायाचित्रांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला आहे.
भ्रमणध्वनीद्वारे काढलेल्या छायाचित्रांचे हे पहिलेच प्रदर्शन असावे. त्यात लहान मुले, लग्नसराई, मानवी जीवन, स्थिर चित्र असे विविध विषय हाताळले आहेत. अगदी साधे, रोजच्या जीवनात कधी नकळत आपल्या काळजाला भिडणारे विषय, वास्तू तसेच वस्तु यांना तांबट यांनी भ्रमणध्वनीद्वारे बोलते केले आहे.
भ्रमणध्वनी कॅमेऱ्याचे तंत्र आणि सावली प्रकाशाचा कलात्मक वापर हे तांबट यांच्या छायाचित्रांचे वैशिष्ठय़े आहे. याआधी तांबट यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळा, लहान मुले, लग्नसराई, निसर्ग वेगवेगळे विषय हाताळले आहेत. या अनोख्या प्रदर्शनास कलाप्रेमींनी भेट द्यावी, असे आवाहन तांबट यांनी केले आहे.