सांगीतिक विचार स्पष्ट करणारी दुर्मिळ पत्रेही पाहायला मिळणार

हीरकमहोत्सवी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवामध्ये किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांना छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येणार आहे. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या या प्रदर्शनामध्ये खाँॅसाहेबांच्या मोठय़ा आकारातील छायाचित्रांसह सांगीतिक विचार स्पष्ट करणारी त्यांची दुर्मिळ पत्रेही पाहण्याचा लाभ संगीतप्रेमींना मिळणार आहे.
सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचा हीरकमहोत्सव आणि सवाई गंधर्व यांचे गुरू आणि किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँॅसाहेब यांची अमृतमहोत्सवी पुण्यतिथी असे दुहेरी औचित्य साधून हे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांची ही संकल्पना प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी प्रत्यक्षामध्ये साकारली आहे. महोत्सवादरम्यान सहाही दिवस (११ डिसेंबर ते १६ डिसेंबर) हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
प्रदर्शनाविषयी माहिती देताना सतीश पाकणीकर म्हणाले, ज्येष्ठ गायिका गंगुबाई हनगल यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त १९८७ मध्ये मी हुबळी येथे किराणा घराण्याच्या कलाकारांसंदर्भातील छायाचित्र प्रदर्शन केले होते. त्यावेळी कपिलेश्वरी यांच्याकडून उस्ताद अब्दुल करीम खाँॅसाहेबांची दुर्मिळ छायाचित्रे मिळविण्यामध्ये यश आले. त्याचप्रमाणे खाँॅसाहेबांच्या पणती आणि किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका मीना फातर्पेकर यांच्याकडून काही छायाचित्रे मिळाली आहेत. त्याचप्रमाणे ‘विश्रब्ध शारदा’ या पुस्तकामधील खाँॅसाहेबांची छायाचित्रे आणि त्यांचे सांगीतिक विचार स्पष्ट करणारी चार पत्रेदेखील या प्रदर्शनामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. कपिलेश्वरीबुवा यांना पाठविलेल्या पत्रामध्ये खाँॅसाहेबांनी रागाबद्दल माहिती दिली असून केतकर यांना पाठविलेल्या पत्रामध्ये किराणा गावाची आणि घराण्याची माहिती दिली आहे. ‘ही सर्व माहिती खरी आहे. जर कोणाला काही शंका आहे त्याला मला भेटण्यास सांगणे’, असेही या पत्रात त्यांनी नमूद केले आहे. जुन्या पद्धतीच्या कागदावर नव्याने मुद्रित करून या पत्रांना ‘नॉस्टेल्जिक फील’ देण्यात आला आहे. तर, खाँॅसाहेबांची संकलित झालेली २८ छायाचित्रे काहीशा चांगल्या पद्धतीने संस्कार करून २० बाय २४ या आकारात लावण्यात येणार आहेत.