शारीरिक शिक्षणाचे शिक्षक तयार होण्यासाठी राज्यभर विविध स्तरावर प्रयत्न होत असताना मुंबई विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभाग मात्र पूर्णत: दुर्लक्षित आहे. येथील गरसोयींबाबत विद्यार्थ्यांनी कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्याकडे तक्रार केली असली तरी याकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ होत नसल्याचे चित्र आहे.
शारीरिक शिक्षण विभाग म्हटला की त्यात खेळाचे साहित्य असलेच पाहिजे. पण याच साहित्याची वानवा मुंबई विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागात दिसून येत आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिने उलटून गेले तरी येथील विद्यार्थ्यांना नियमाने देण्यात येणारे दोन गणवेश, दोन टी-शर्ट्स, ट्रॅकसूट, आंतर महाविद्यालीन स्पध्रेला घालण्यासाठी आवश्यक असलेले कपडे उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. ग्रंथालयात आवश्यक अशी कोणतेही पुस्तके उपलब्ध नाहीत अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.
वर्ग खोल्यांकडे तर कुणाचेच लक्ष नाही. येथे पंखे, संगणक आदी आवश्यक गोष्टीही उपलब्ध नाहीत. इतकेच नव्हे, तर विद्यार्थ्यांना आंतरमहाविद्यालयीन स्पध्रेला पाठविण्यासाठीही कोणतेही प्रोत्साहन विभागाकडून देण्यात येत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. सप्टेंबर महिन्यात लांजा येथे झालेल्या स्पध्रेत सहभागी होण्यासाठी जेव्हा विद्यार्थ्यांना विनंती केली त्या वेळेस त्यांना प्रवास खर्चसुद्धा देण्यास विभागाने नकार दिला.
नाइलाजाने विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने जाण्याचा प्रस्ताव ठेवला. पण त्यांना तरीही नकारघंटा कायमच राहिली. अशा प्रकारे संधी हिरावून घेण्यात येत असल्याने विद्यार्थी प्रचंड नाराज आहेत. ऑगस्टपासून आम्हाला कबड्डी, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस आदी स्पर्धाना मुकावे लागले आहे.
विभागात प्रथमोपचार पेटी नसल्यामुळे सराव करताना जर कुणाला लागले तर त्यावर उपचार करण्यासाठी संकुलाच्या बाहेरील डॉक्टरांकडे जावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विभागाला पूर्णवेळ प्रमुख नसून विद्यार्थ्यांचे यामुळे मोठे नुकसान होत आहे. मुलींच्या स्वच्छतागृहातही दरुगधीचे साम्राज्य असून विभागात साफसफाईच होत नसल्याची तक्रार एका विद्याíथनीने केली.
विभागात सध्या शारीरिक शिक्षणाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी ४८, पदव्युत्तर पदवी शिक्षणाच्या पहिल्या वर्षांला ३०, तर दुसऱ्या वर्षांला ३० विद्यार्थी शिकत असून त्यांनी या संदर्भात कुलगुरूंकडे तक्रार केली. विद्यापीठाने अर्थसंकल्पात तरतूद करूनही विभागातर्फे पसे देण्यास टाळाटाळ केली जाते. तरीही त्यावर काही झाले नाही म्हणून या विद्यार्थ्यांनी आता उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांना साकडे घालण्याचा विचार केला आहे.
विद्यार्थ्यांच्या बाजूने आता विविध संघटना उभ्या राहिल्या आहेत. विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून देऊ, असा दावा ‘वीमेन फोरम’च्या अध्यक्ष सुनीता गोडबोले यांनी केला; तर या विभागाच्या चौकशीसाठी काही महिन्यांपूर्वी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, अशी मागणी युवा सेनेचे सभासद आणि विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागण्या आमच्यापर्यंत पोहोचल्या असून त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांनी दिले आहे.