श्री क्षेत्र पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेच्या पाश्र्वभूमीवर प्रशासन व पोलीस दलाचे कर्मचारी हे भाविकांच्या सुरक्षिततेला जास्त महत्त्व देतात. गतवर्षांप्रमाणे यावर्षीही प्रशासनाचे र्निबध व निर्णय हे बंधनकारक राहणार आहेत. यात्रेस कोणतेही गालबोट न लावता यात्रा शांततेत पार पाडावी, असे आवाहन कराड विभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांनी केले.
पाल (ता. कराड) येथील प्रसिध्द यात्रा १३ जानेवारी रोजी होत आहे. त्यानिमित्त नियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी तथा कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, तहसीलदार सुधाकर भोसले, उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अरूण देवकर, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष रघुनाथ खंडाईत, सरपंच मगेश कुंभार, यात्रा कमिटीचे अध्यक्ष दिनकरराव खंडाईत, व्यवस्थापक वसंतराव काळभोर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यात्रेच्या अनुषंगाने केलेल्या तयारीचा गोषवारा यावेळी सादर करण्यात आला.
घट्टे म्हणाले, की प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी व ग्रामपंचायत यांनी यात्रेचे नियोजन केले आहे. देवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी सज्ज असून, योग्य ते नियोजन केले आहे. तसेच, यात्रा कालावधीत एसटी बस थांब्याची समस्या प्रकर्षांने जाणवणार असल्याची शक्यता व्यक्त करून एसटी महामंडळाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना त्यांनी केल्या.
देवराज पाटील म्हणाले, की श्रीक्षेत्र खंडोबाची पाल येथील वर्षांनुवष्रे चालत असलेली परंपरा टिकण्याबरोबरच यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याबरोबर कायदा सुव्यवस्था राखून भाविकांना सहकार्य करावे.
सुधाकर भोसले म्हणाले, की गतवर्षी तारळी नदीपात्रातील मिरवणूक मार्ग पूर्णत: मोकळा ठेवण्यात आला होता. हा बदल यावर्षीही कायम राहणार आहे. यात्रा कालावधीत कोणतीही दुर्घटना घडू नये, या अनुषंगाने यात्रेत योग्य ते बदल व आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवली जाणार आहे. गतवर्षीप्रमाणे मेटल डिटेक्टर, अग्निशामक बंब, संपूर्ण यात्रेचे व्हिडीओ चित्रीकरण, ध्वनीक्षेपकासह मंदिराच्या सजावर व वाळवंटात टेहळणी मनोरे उभारून यात्रेवर काटेकोर नियंत्रण राखले जाणार आहे. यात्रेत यापूर्वी खोबऱ्याच्या वाटय़ा, काठय़ा आदींवर घातलेले र्निबध यापुढेही कायम राहणार आहेत. उत्पादन शुल्क खाते, अन्न भेसळ विभाग, परिवहन विभाग यांनीही आपली कामे चोख करावीत, अशा सूचना तहसीलदारांनी यावेळी दिल्या. यात्रा नियोजनाच्या या बैठकीस सर्वच शासकीय खात्यांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.