पनवेल शहरातील पायोनियर परिसरात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी उभारण्यात आलेले नवीन रोहित्र सोमवारी कार्यान्वित झाले. शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांच्या हस्ते हे रोहित्र कार्यान्वित करण्यात आले.शहरातील पायोनियर परिसरात सात गृहनिर्माण सोसायटय़ा आहेत. त्यात सुमोर अडीचशे वीज ग्राहक आहेत. मागील वर्षभरापासून या परिसरात सतत वीजपुरवठा खंडित होत होता. सातत्याने याबाबत तक्रारी करण्यात येत होत्या. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चाही नेण्यात आला होता. त्याची गंभीर दखल घेत महावितरणने या समस्येवर मात करण्यासाठी रोहित्र बसविण्याचा निर्णय घेतला होता. या रोहित्रासाठी सुमारे सात लाख रुपयांचा खर्च आला आहे.हे रोहित्र कार्यान्वित करण्याचा छोटेखानी कार्यक्रम बांदेकर यांच्या उपस्थित पार पडला. या कार्यक्रमावेळी जमलेल्यांनी दूरदर्शन वाहिनीवर दिसणाऱ्या आपल्या लाडक्या भावोजींचा चेहरा पाहायला आणि त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी एकच गर्दी केली होती. स्थानिक रहिवाशांनी या वेळी बांदेकर यांच्यासह पनवेल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष चारुशीला घरत, नगरसेवक प्रथमेश सोमण आणि नितीन पाटील, वीज महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता जगदीश बोडके यांचा सत्कार केला. पायोनियर सोसायटीच्या परिसरात अजूनही पाच रोहित्रे कार्यन्वित केल्यास येथील विजेचा खेळखंडोबा संपेल, परंतु जागेअभावी ही रोहित्रे उभारता येत नाहीत, असा दावा महावितरण कंपनीने केला आहे. या परिसरात सुमारे सात हजार वीज ग्राहक आहेत.
आरोग्य शिबीर
पनवेल शहरातील प्राचीन रुग्णालयामध्ये सकाळी पत्रकारांच्या आरोग्यचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ ३५ पत्रकारांना झाला. आदेश बांदेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी बांदेकर यांनी पत्रकारांनी सतत निर्भीडपणे लिहिले पाहिजे. तसेच स्वत:च्या आरोग्यासह पत्रकारांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्लाही बांदेकर यांनी दिला. यासाठी पनवेलमधील स्थानिक डॉक्टरांच्या संघटनांनी पुढाकार घेऊन पत्रकारांच्या कुटुंबीयांना प्रत्येक रुग्णालयामध्ये ५० टक्के सवलतीच्या दरामध्ये उपचार कसे मिळतील, याचीही जबाबदारी घेणे गरजेचे असल्याचे बांदेकर या वेळी म्हणाले.