गणरायाच्या आगमनाचे वेध लागलेले असतानाच रस्त्यांवरील खड्डारुपी विघ्ने दूर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी म्हणजेच २५ ऑगस्टपर्यंत गणेश आगमन व विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्याचे आश्वासन पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिले आहे. काही अटी-शर्तीची पूर्तता करणाऱ्या नव्या गणेशोत्सव मंडळांनाही आवश्यक ती परवानगी देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. जाहिरातीचे फलक अथवा मंडपासाठी रस्ते खोदण्याऐवजी पिंपाचा वापर करावा, असे आवाहनही आयुक्तांनी मंडळांना केले. मात्र बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या आक्रमक भूमिकेमुळे बैठकीत खडाजंगी झाली.
गणेशोत्सवाच्या तयारी संदर्भात पालिका मुख्यालयात बुधवारी महापौर सुनील प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, श्री सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती (उपनगरे)चे पदाधिकारी आणि सरकारी यंत्रणांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. गणेश आगमन आणि विसर्जन मार्गामध्ये तब्बल तीन हजार खड्डे असल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी महापौर आणि पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच नव्या गणेशोत्सव मंडळांची पालिकेकडून अडवणूक होत असून खड्डय़ांचे खापर मंडळांवर फोडण्यात येत असल्याची तक्रारही त्यांनी यावेळी केली. पालिका अधिकाऱ्यांकडून मंडळांची अडवणूक होत असल्याचा पाढाही त्यांनी यावेळी वाचला. गिरगाव आणि दादर चौपाटीवर विसर्जनाच्या दिवशी प्रचंड गर्दी होते. तेथे फिरती शौचालये, जीवरक्षकांसाठी आवश्यक त्या बोटी आणि साधने उपलब्ध करावीत. घरगुती गणेशमूर्तीची २००० पेक्षा अधिक संख्या असलेल्या ठिकाणी कृत्रिम तलाव उभारावेत, असेही अ‍ॅड. दहिबावकर यांनी यावेळी सूचित केले.
गणेशोत्सवापूर्वी १५ ते २५ ऑगस्ट दरम्यान दोन टप्प्यांमध्ये गणेश आगमन आणि विसर्जन मार्गामधील खड्डे बुजविण्यात येतील. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदारांना सहकार्य करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्तांना देण्यात येतील. त्यामुळे हे रस्ते लवकर खड्डेमुक्त होतील, असा आशावाद सीताराम कुंटे यांनी व्यक्त केला. मात्र गणेशोत्सव मंडळांनी मंडप अथवा जाहिरातींचे फलक झळकविण्यासाठी खड्डे खोदू नये. त्यासाठी पिंपांचा वापर करावा, त्यामुळे भविष्यातही रस्ते खड्डेमुक्त राहतील, असा सल्ला आयुक्तांनी मंडळांना दिला.
अवयव दानासाठी मंडळांना आवाहन
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अवयव दानासाठी जनजागृती करावी. गणेशोत्सवात मोठय़ा संख्येने सहभागी होणाऱ्या भाविकांना अवयव दानाचे महत्त्व पटवून दिल्यास गरजू व्यक्तींना मदत होईल, असे आवाहन महापौर सुनील प्रभू यांनी यावेळी केले.
खड्डय़ांची वही भेट
रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांची वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली छायाचित्रे एका वहीत चिकटवून ठेवण्याचा छंद गिरगावमधील कुंभारवाडय़ातील विनायक पांडुरंग शिंदे (२९) या तरुणाला जडला होता. या तरुणाने तयार केलेली ही वही अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी सुनील प्रभू यांना भेट दिली. खड्डे बुजविण्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल अतिरिक्त आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्यावर टीका करणाऱ्या छायाचित्रांनी या वहीचे मुखपृष्ठ सजविण्यात आले होते.