कल्याण, डोंबिवलीतील मुख्य रस्ते गल्लीबोळात महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानग्यांमुळे विविध मोबाइल, बीएसएनएल सेवा कंपन्यांनी खोदून ठेवले आहेत. नागरिकांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. वाहतूक कोंडीत नव्याने भर पडून शहरात वाहन चालविणे अवघड झाले आहे, अशी टीका सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली.
दोन्ही शहरांत खणून ठेवलेले रस्ते, चर, खड्डय़ांच्या विषयावर काँग्रेसचे नगरसेवक विश्वनाथ राणे, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, भाजपच्या डॉ. शुभा पाध्ये यांनी सभा तहकुबी मांडली होती. या विषयावर सत्ताधारी शिवसेना, भाजप, विरोधी बाकावरील मनसे, काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी प्रशासनातील नियोजनाचा अभाव, विविध विभागांमधील अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव या विषयावर प्रशासनाला धारेवर धरले. कल्याणमध्ये पारनाका, मुरबाड रोड, डोंबिवलीत राजाजी रोड, मानपाडा रोड, टिळक रोड, शिवमंदिर रोड भागांत बीएसएनएल, रिलायन्स, महानगर गॅस, महावितरण कंपन्यांकडून सेवा वाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. सुस्थितीत असलेल्या रस्त्यांवर महापालिकेने वेगवेगळ्या कंपन्यांना एक ते दोन कोटी रुपये दर आकारून खोदण्यास परवानगी दिली आहे. हे रस्ते खोदताना नागरिक, तसेच वाहनांची वर्दळ अशा कशाचाही विचार केला जात नाही, अशी टीका प्रशासनावर करण्यात आली.
या रस्ते खोदाईतून प्रशासनाला ११ कोटींचा महसूल मिळाला आहे, असे अभियंता दीपक भोसले यांनी यासाठी तुम्ही नागरिकांना का वेठीस धरता असा प्रश्न नगरसेवकांनी केला. मोबाइल कंपन्यांकडून एलबीटीपोटी पालिकेने २ कोटी ९४ लाख रुपये वसूल केले आहेत, असे साहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले. दोन्ही शहरांत सुरू असलेली रस्ते खोदण्याची कामे तात्पुरती थांबविण्यात येतील. या रस्ते खोदाई काम, सिमेंट रस्ते कामाचे योग्य नियोजन करून मगच खोदण्यास परवानगी देण्यात येईल, असे आयुक्त भिसे यांनी महासभेत सांगितले. तर महापौर कल्याणी पाटील यांनी ही कामे तातडीने थांबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले.