देशात एकमेव स्मार्ट सिटी असलेल्या बंगळुरूनंतर आता नवी मुंबईतील खारघर, कळंबोली, नवीन पनवेल या उपनगरांना स्मार्ट सिटी बनविण्याचा निर्णय सिडकोने घेतला असून या योजनेंतर्गत लवकरच या क्षेत्रामध्ये एकूण ४९३ सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या तिसऱ्या डोळ्यामुळे शहरात होणारी वाहतूक कोंडी, हवामानाचा अंदाज, वीज, पाणी जाण्याच्या वेळा, आपत्कालीन स्थिती यांचा ‘आंखो देखा हाल’ घरबसल्या घेता येणार आहे. त्यासाठी दहा इमर्जन्सी कॉलिंग बॉक्सेस, वीस पब्लिक अॅड्रेस सिस्टीम, तीस मॅसेजिंग साइन बोर्ड लावण्यात येणार आहेत. येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा आगळावेगळा प्रयोग असणारा प्रस्ताव येणार आहे.
नवी मुंबई पालिका क्षेत्र वगळता सिडकोकडे खारघर, तळोजा, पाचनंद, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, द्रोणागिरी, उलवा, ही उरण-पनवेल तालुक्यातील उपनगरांचे कार्यक्षेत्र आहे. सिडको सध्या या भागातील सोयीसुविधांवर लक्ष केंद्रित करीत असून जगातील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प या क्षेत्रात येत आहेत. यात सिडकोच्या विमानतळ, मेट्रो, नयना या प्रकल्पांचा समावेश आहे. गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क, ग्रामभवन यांसारख्या प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून सरकार विमानतळाच्या टेक ऑफच्या प्रतीक्षेत आहे. याच काळात सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रातील नवी मुंबईला हायटेक बनविण्याचा निर्णय घेतला असून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी खारघर, नवीन पनवेल, कळंबोली या क्षेत्रासाठी स्मार्ट सिटी योजना प्रत्यक्षात आणण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या उपनगरामध्ये दोन टप्प्यांत ४९३ सीसी टीव्ही लागणार असून पहिल्या टप्प्यात येत्या सहा महिन्यांत १९२ सीसी टीव्ही लावले जाणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३०१ सीसी टीव्ही लावले जाणार आहेत. सिडकोच्या अगोदर नवी मुंबई पालिकेने शहरात सुमारे २६२ सीसी टीव्ही कॅमेरे लावले असून त्यांची जोडणी नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला दिली आहे. त्यामुळे अनेक गुन्ह्य़ांची उकल होत असली तरी हे सीसी टीव्ही नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांचे वीज व इंटरनेट बिल कोणी द्यायचे हा वाद अद्याप अनुत्तरित आहे. सध्या पालिका ही बिले भरत आहे. सिडकोच्या क्षेत्राचे उत्तरदायित्व सिडकोकडेच असल्याने सिडको प्रशासनाने या सीसी टीव्ही कॅमेरांचा विविधरंगी वापर करण्याचे ठरविले आहे. हे कॅमेरे पोलीस नियंत्रण कक्षाला तर जोडले जाणार आहेतच पण यशिवाय या कॅमेराद्वारे सिटिझन पोर्टल सिस्टीम तयार केली जाणार असून त्या अनुषंगाने नागरिक घरबसल्या शहरातील घडामोडी पाहू शकणार आहे. हातातील मोबाइलवर या  घडामोडी पाहता याव्यात यासाठी सिडको एक अॅप्लिकेशनदेखील तयार करणार आहे. नागरिकांना आपल्या समस्या तसेच सुविधा लवकरात लवकर सांगता, पाहता याव्यात यासाठी आपत्कालीन संपर्क यंत्रणा (इमर्जन्सी कॉलिंग बॉक्सेस) जनता संपर्क प्रणाली (पब्लिक अॅड्रेसेस सिस्टीम) आणि विविधरंगी संदेश फलक (व्हेरिएबल मॅसेजिंग बोर्ड) लावण्यात येणार आहेत. या परिसरात वायफाय यंत्रणा सुरू करण्याचा सिडकोचा विचार आहे. या यंत्रणेवर सिडको सुमारे ६० कोटी रुपये खर्च करणार आहे.