‘काम चालू रस्ता बंद’चा फलक लावून यवतमाळ-मूर्तीजापूर ही ‘शकुंतला’ नावाने ओळख असलेली रेल्वे गेल्या चार महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या कामासाठी रेल्वे बंद केली ते काम कधीच पूर्ण झाले आहे.
यवतमाळजवळील दर्डा उद्यानाजवळ असलेल्या रेल्वे फाटकाचे आणि उखडलेल्या रुळांचे काम करायचे आहे म्हणून ‘शकुंतला’ विश्राम करीत असल्याचे सांगण्यात येत होते, पण आता फाटकाचे व रूळ दुरुस्तीचे काम पूर्ण होऊनसुद्धा रेल्वे सुरूहोत नाही, यामागे ही रेल्वे कायमची बंद करण्याचा घाट घातला जात आहे, असा संशय जनता व्यक्त करीत आहे. आजही ही रेल्वे ब्रिटिश कंपनी क्लिीक निक्सनच्या मालकीची असून तिचे व्यवस्थापन सेंट्रल रेल्वेकडे आहे. ही ब्रिटिश कंपनी १८५७ मध्ये स्थापन झाली. या कंपनीच्या तीन रेल्वे आजही भारत सरकारच्या ताब्यात नाही. यवतमाळ-मूर्तीजापूर, पुलगाव-आर्वी, मूर्तीजापूर-अचलपूर, अशा तीनही गाडय़ा विदर्भात असून पुलगाव-आर्वी ही शकुंतला नॅरोगेज गाडी कायमची बंद झाली आणि आता यवतमाळ-मूर्तीजापूर ही ‘शकुंतला’ कायमची बंद करण्याचा घाट घातला जात आहे.
शकुंतला बंद होऊ देणार नाही, असा इशारा भाजप खासदार हंसराज अहीर, सेना खासदार भावना गवळी व सेना आमदार संजय राठोड आदींनी दिला असला तरी ‘शकुंतला’चे प्रशासन त्याकडे गांभीर्याने पहात नाही. यवतमाळ-मूर्तीजापूर दरम्यान सतरा थांबे आहेत. पैकी जवळपास १२ थांब्यांवरील रेल्वेचा सर्व कारभार गुंडाळलेला आहे. आता तेथे रेल्वेचे केवळ अवशेष दिसतात. गरीब माणसांची लेकुरवाळी असलेली शकुंतला  टप्या टप्प्याने बंद केली तर जनक्षोभ उसळणार नाही, असा रेल्वे प्रशासनाचा होरा आहे. म्हणूनच दुरुस्तीचे निमित्त करून चार महिन्यांपासून शकुंतला बंद ठेवण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम आटोपले तरी ‘शकुंतले’चा ‘विश्राम’ पूर्ण झाला नाही. शकुंतलेचे चालणे पुन्हा सुरूव्हावे म्हणून विधिमंडळ अधिवेशनात कोण आवाज उठवणार, हा सध्या जोरदार चर्चेचा प्रश्न आहे.
सुदामकाका देशमुख आणि हरीश मानधना हे दोघे आमदार होते तेव्हा त्यांनी विधिमंडळात शकुंतलेच्या वेदनांना वाचा फोडली होती त्यामुळे शकुंतलेचे वाफेचे इंजिन बदलून तिला डिझेलचे इंजिन मिळाले होते, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.