नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत देणार निधी
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ग्रामीण व शहरी भागासाठी पिण्याच्या पाण्याकरिता केलेल्या तरतुदीतील मोठा भाग टँकरच्या व्यवस्थेस आहे. परभणी जिल्ह्य़ाच्या सीमेवरील निम्न दुधना सिंचन प्रकल्पातून टँकर भरण्यासाठी तेथे प्लॅटफॉर्म उभारण्यास जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १ कोटी १३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.
जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांनी सांगितले की, निम्न दुधना प्रकल्पातून परतूर, मंठा व घनसावंगी तालुक्यांतील गावांना टँकरद्वारे पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे खडकपूर्णा नदीत चर खोदण्यास १ कोटी ८० लाख तरतूद असून तेथून भोकरदन व जाफराबाद तालुक्यांतील गावांना पाणीपुरवठय़ाचे नियोजन आहे. नव्याने दहा टँकर खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीने १ कोटी ३३ लाख निधी उपलब्ध करून दिला आहे. भारनियमनामुळे अनेक ठिकाणी टँकर भरण्यासाठी अडथळे येतात, म्हणून अशा ठिकाणी जनरेटर भाडय़ाने घेणे अथवा इंधनासाठी ५५ लाखांची तरतूद केली आहे.
गावांमध्ये टँकरने पोहोचणाऱ्या पाण्याची साठवणूक करण्यास प्लास्टिक टाक्या खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीने जवळपास १ कोटी ८७ लाख निधी उपलब्ध केला आहे. जाफराबाद या तालुक्याच्या ठिकाणी तात्पुरती पाणीयोजना करण्यासाठी १ कोटी १३ लाख निधीची तरतूद केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पाणीटंचाई निवारण उपाययोजनांसाठी ११ कोटींपेक्षा अधिक निधीची उपलब्धता केली आहे.
पाणीपुरवठय़ात विजेचा अडथळा येऊ नये, याकडे प्रशासनाचे लक्ष आहे. मंठा या तालुक्याच्या गावातील पाणीपुरवठय़ात व्यत्यय येऊ नये, म्हणून तेथे ‘एक्स्प्रेस फीडर’साठी जिल्हा नियोजन समितीने १३ लाख ५८ हजारांचा निधी केला आहे.
नावीन्यपूर्ण योजनाअंतर्गत बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे पाणी योजनेसाठी एक्स्प्रेस फीडर बसविण्यास १७ लाख रुपये देण्यात आले. ग्रामीण भागातील विंधन विहिरींच्या दुरुस्तीस वाहन खरेदीसाठी ४० लाख देण्यात आले. ग्रामीण भागातील पाण्याच्या टँकरवर देखरेख ठेवण्यासाठी ‘जीपीआरएस सिस्टीम’ बसविण्यासाठी १५ लाखांची तरतूद केली आहे.
जालना शहरासाठी थेट जायकवाडी जलाशयातून राबविण्यात येणाऱ्या पाणी योजनेसाठी पैठण व अंबड येथे वीजपुरवठय़ासाठी २ कोटी ३६ लाख निधी नावीन्यपूर्ण योजना अंतर्गत उपलब्ध करण्यात आला.
घाणेवाडी जलाशयातील गाळ काढण्यासाठी असलेल्या यंत्रांना डिझेल पुरवठा करण्यासाठी या योजनेतून ७ लाख ६९ हजार निधी उपलब्ध केला आहे. ‘नावीन्यपूर्ण योजना’ अंतर्गत ग्रामीण भागास ७२ लाख ४८ हजार, तर नागरी भागास २ कोटी ४३ लाख निधी उपलब्ध केल्याचे जिल्हाधिकारी देशपांडे यांनी सांगितले.