रेल्वे प्रवासादरम्यान होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने विविध पावले उचलली जात असली तरी डोंबिवली स्थानकातील ‘अर्धवट’ प्लॅटफॉर्मची स्थिती तशीच आहे.
स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर गाडी शिरताच डाव्या बाजूला प्लॅटफॉर्म सुरू होतो, त्यानंतर अचानक पोकळी आणि नंतर पुन्हा प्लॅटफॉर्म सुरू होतो. प्रवाशांना याचा अंदाज आला नाही तर उतरताना अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर अशा प्रकारे अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. उपनगरीय रेल्वे मार्गावरील ठाण्यापल्याडच्या स्थानकांची उंची वाढत असताना डोंबिवलीमधील ही जीवघेणी पोकळी मात्र कायम आहे. त्यामुळे डोंबिवली स्थानकातील हा खड्डा बुजवण्यासाठी एखाद्या अपघाताची वाट रेल्वे प्रशासन पाहत आहे का, असा संतप्त सवाल रेल्वे प्रवासी संघटनेकडून केला जात आहे.