एके काळी शास्त्रीय संगीताच्या साडेचार हजारांवर मैफलींमध्ये गाऊन उच्चांक निर्माण करणारे ‘मैफिलींचे बादशाह’ संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनी तर्फे अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली. वाहिनीने सादर केलेल्या ‘स्वरसंवाद’ या खास कार्यक्रमातून मास्टर कृष्णरावांबद्दल अतिशय दुर्मीळ अशा माहितीचा मोठा खजिनाच रसिक श्रोत्यांसमोर आला.  
अनेक मौलिक आठवणींचा हा खजिना त्यांची कन्या गीतकार, संगीतकार वीणा चिटको यांनी उलगडला. मास्टर कृष्णरावांना अगदी लहान वयातच ‘बालतानसेन’ ही उपाधी मिळाली होती. आणि ती कशी सार्थ होती याचे किस्से सांगताना माणसांप्रमाणेच पशु-पक्षीही त्यांच्या गाण्याकडे कसे आकृष्ट होत, याचा अनुभवही त्यांनी ऐकवला. एकदा त्यांचे गायन सुरू असताना एक माकड अडीच तास गाणे ऐकत बसले होते. कृष्णरावांनी अनेक राजघराण्यांतील मैफली आपल्या गायनाने गाजवल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले.  मास्टर कृष्णरावांच्या गाण्यांचे कौतुक चार्ली चॅप्लीन यांनीही केले होते. ‘माणूस’ या मराठी चित्रपटाची हिंदी आवृत्ती असलेल्या ‘आदमी’ चित्रपटातील गाणी चार्ली चॅप्लीन यांनी ऐकली आणि कृष्णरावांचे खास कौतुकही केले, अशी आठवण या कार्यक्रमात वीणा चिटको यांनी सांगितली. त्यांच्याबरोबरच आकाशवाणीच्या काही जुन्या-जाणत्या श्रोत्यांनीही कृष्णरावांबद्दलच्या आठवणी सांगितल्या. गाणी आणि आठवणींतून उलगडत केलेला हा कार्यक्रम दीर्घकाळ श्रोत्यांच्या मनात घर करून राहील इतका रंगला.