पाऊलबुद्धेंनी वेधले आयुक्तांचे लक्ष
सावेडीतील एकातरी नगरसेवकाने अखेर सावेडीतीलच महापालिकेच्या नियोजित नाटय़गृहाचा विषय आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे उपस्थित केला. निविदा स्तरावर असलेला हा विषय त्वरेने मार्गी लावावा, अशी मागणी मनपाचे विरोधी पक्षनेते विनित पाऊलबुद्धे यांनी आयुक्तांकडे केली.
सावेडी क्रीडा संकुलाच्या जागेवर हे नाटय़गृह होणार आहे. मनपात नियोजनाचा असा दुष्काळ आहे की या जागेवर त्यांनी आताच कचरा डेपो केला आहे. सगळ्या सावेडीतील ओलासुका कचरा या ठिकाणी येऊन पडतो. नंतर तो उचलून बुरूडगावच्या कचरा डेपोत नेला जातो. मनपाच्या कचरा वाहतुकीच्या गाडय़ा नेहमीच बिघडतात, कर्मचारी कंटाळा करतात, कधी त्यांचे नियोजनच केलेले नसते अशा वेळी या क्रीडा संकुलाच्या मागील जागेवरचा हा कचरा साचून राहतो, त्याची दरुगधी सुटते, डास होतात, सार्वजनिक आरोग्य बिघडते, प्रामुख्याने लहान मुले आजारी पडतात.
या सगळ्याला वैतागून त्या परिसरातील नागरिकांनी पाऊलबुद्धे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी ती आयुक्तांपर्यंत नेलीच वर त्यांना तुम्ही समक्ष येऊन पाहणी करा असेही सुचवले. त्याप्रमाणे आयुक्त आले, त्यांनी पाहणी केली, कचरा रोजच्या रोज वेळेवर उचलला जावा अशी तंबी कचरा विभागाचे प्रमुख, तसेच स्वच्छता निरीक्षकांना दिली. याच दरम्यान पाऊलबुद्धे यांनी त्यांना या जागेवरील नियोजित नाटय़गृहाचा विषय उपस्थित केला. राज्य सरकारकडून यासाठी मनपाकडे तब्बल ६० लाख रूपये वर्ग झाले आहेत. मनपाच्या दुर्लक्षामुळे एकदा ते परत गेले होते. सुदैवानेच ते पुन्हा मिळाले. मात्र आता त्यालाही ३ वर्षे होऊन गेली तरीही मनपाचे नाटय़गृहाचे गाडे काही पुढे सरकायला तयार नाही.
साडेआठ कोटी रूपयांचा हा प्रकल्प आहे. मनपाला तो खासगीकरणातून उभा करायचा आहे. त्याची निविदा दोन वेळा प्रसिद्ध करण्यात आली. मात्र मनपाची आता राज्यभर अशी बदनामी झाली आहे की कोणीही निविदा दाखल करायला येत नाही. त्याप्रमाणे याही निविदेला प्रतिसाद मिळालेला नाही. आयुक्तांनी निर्विकारपणे पाऊलबुद्धे यांना तसे सांगितले.
 मोठय़ा आसन क्षमतेचे मोठय़ा खर्चाचे नाटय़गृह न बांधता कमी आसनक्षमतेचे व कमी खर्चाचे डिझाईन का केले गेले नाही या पाऊलबुद्धे यांच्या प्रश्नावर आयुक्तांनी तसे करून पाहू म्हणून सांगितले. सावेडीकरांची फार मोठी सांस्कृतिक गरज असलेल्या या विषयावर मनपा प्रशासन तर उदास आहेच, पण त्यापेक्षाही या भागातील नगरसेवकांना त्यावर एकत्र येऊन आवाज उठवावा वाटत नाही हीच फार मोठी शोकांतिका आहे, असे मत पाऊलबुद्धे यांनी नंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.