आमदार-महापौरांच्या भोसरी बालेकिल्ल्यात जवळपास २५ कोटी रुपये खर्च करून उभारलेले अंकुशराव लांडगे नाटय़गृह मुळातच रडतखडत सुरू झाले आणि आता दीड वर्षांनंतर त्याचे भाडे व अन्य दर निश्चित करण्यात येत आहेत. चिंचवड व िपपरीतील नाटय़गृहांच्या तुलनेत ५० टक्के अधिक दर लावून त्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने पालिका सभेसमोर मांडला असून त्यात प्रयोग हस्तांतर फी म्हणून ४५०० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. आवश्यक सुविधांच्या नावाने ठणठणाट असताना भाडेवाढ करण्याच्या कृतीने नाटय़क्षेत्रात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जवळपास चार वर्षे काम चाललेले भोसरी नाटय़गृह १ एप्रिल २०११ पासून वापरात येऊ लागले. प्रशासनाची कमालीची अनास्था असल्याने सुरूवातीपासूनच नाटय़गृहाच्या अडचणींचा पाढा सुरू असून आजही तो कायमच आहे. नाटय़गृहाचे भाडे अद्याप ठरवण्यात आले नाही. चिंचवडचे प्रा. रामकृष्ण मोरे व िपपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात आकारण्यात येणाऱ्या दरापेक्षा ५० टक्के जास्त दर ठरवून लांडगे नाटय़गृहाचे कामकाज सुरू करण्यात आले. मात्र, त्यास मान्यता नव्हती. त्याच मान्यतेसाठी हा प्रस्ताव पालिका सभेसमोर मांडण्यात आला आहे.
भोसरी नाटय़गृहात अधिक सुविधा असल्याने जादा दर लावण्यात येत असल्याचे समर्थन नाटय़गृह व्यवस्थापनाकडून करण्यात येते. प्रत्यक्षात आवश्यक सुविधांची वानवा असल्याच्या तक्रारी आहेत. एवढय़ा मोठय़ा व खर्चिक नाटय़गृहात चहापानासाठी कॅन्टीन उपलब्ध नाही. त्यामुळे कलाकारांची व रसिक प्रेक्षकांची गैरसोय होते. आवाजाच्या अनेक तक्रारी आहेत. खराब आवाजामुळे रंगलेल्या कार्यक्रमाचा विचका होतो, असे अनुभव आहेत. शौचालयाची स्वच्छता होत नसल्याने दरुगधी जाणवते. अर्थातच त्यामुळे, ५० टक्के जादा दर देण्यास संस्था तसेच नागरिक नाखूश असतात. आतापर्यंत रेटून अधिक दर लावणाऱ्या प्रशासनाने त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सभेसमोर हा विषय आणला आहे. मागील दहा वर्षांत भाडेवाढ झाली नसल्याचा युक्तिवादही करण्यात आला आहे. तथापि, आधी आवश्यक सुविधांची पूर्तता करा मगच भाडेवाढ करा, असा आग्रह होत आहे. प्रयोग हस्तांतरण शुल्क ४५०० रूपये ठेवण्यास तसेच दीडपट भाडे देण्यास अनेकांचा विरोध आहे. याशिवाय, अन्य दरातही भरघोस वाढ सुचवण्यात आली असून या सर्वाचा फेरविचार करण्याची मागणी सांस्कृतिक क्षेत्राकडून होत आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी होणाऱ्या सभेत होणार आहे.