राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पाच खेळाडूंना रमा-जगदीश महिला बहुउद्देशीय उत्कर्ष संस्थेच्या वतीने क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आदित्य अनिल गिराम, अबोली अजितकुमार संगवे, ओंकार राजेश काळे, सोनिया नितीन देशमुख व नीहार निर्मलप्रसाद कुलकर्णी हे पुरस्काराचे मानकरी ठरले. याशिवाय के. डी. पाटील, शरद अकतनाळ व चन्न्ोश इंडी यांना क्रीडा संघटक पुरस्काराने गौरविण्यात आले.
जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयात आयोजित समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. रमा-जगदीश महिला बहुउद्देशीय उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष उमेश कमलापूरकर व सचिव शरद नाईक यांनी या समारंभाचे आयोजन केले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिजमोहन पोफलिया व रवींद्र जयवंत हे उपस्थित होते. आदित्य गिराम (सेंट जोसेफ हायस्कूल) याने बंगलोर, पुणे, झारखंड आदी ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धामध्ये नऊ सुवर्णपदके पटकावली आहेत. तर अबोली संगवे (भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालय) हिने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत डायव्हिंग प्रकारामध्ये एक सुवर्ण, सहा रौप्य व कास्य पदके मिळविली आहेत. ओंकार काळे (ममता मूकबधिर विद्यालय) याने राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी गटात सुवर्ण पदक तर एकेरी गटात रौप्य पदक पटकावले होते. सोनिया देशमुख (वालचंद इन्स्टिटय़ूट ऑफ टेन्कॉलॉजी) हिने गोव्यातील शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य पदक मिळविले तर जबलपूूरच्या स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला होता. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा खेळणारी सोनिया देशमुख ही सोलापूरची पहिली खेळाडू आहे. तर मॉडर्न प्रशालेचा नीहार कुलकर्णी याने उजबेगिस्तान (ताश्कंद) येथे झालेल्या मूकबधिर आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली होती.