एकदिवसीय क्रिकेट सामन्यापेक्षा ‘२०-ट्वेंटी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘आयपीएल’ या झटपट निकाल देणाऱ्या बहुचर्चित सामन्यांची भुरळ शहरवासीयांप्रमाणे ग्रामीण भागावरही पडल्याचे पुढे आले आहे. बागलाण तालुक्यातील नामपूर येथे आयोजित नामपूर क्रिकेट लीग (एनपीएल) हे त्याचे उदाहरण. आयपीएलच्या धर्तीवर एकेका संघाची खरेदी करत झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तेंडुलकर्स संघाने ‘शिका पार्टनर्स’चा पराभव करत या चषकावर आपले नाव कोरले.
काही वर्षांपूर्वी उदयास आलेल्या अवघ्या २० षटकांच्या आयपीएल सामन्यांनी क्रिकेट जगताची परिमाणे बदलून टाकली आहेत. या सामन्यांसाठी संघ अन् खेळाडू निवडण्याची पद्धत वेगळी आहे. केवळ काही वेळात उपरोक्त क्रिकेट सामन्यांचे निकाल लागत असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता असते. वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात गुरफटलेली ‘आयपीएल’ शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही तितकीच लोकप्रिय असल्याचे या स्पर्धेने दाखवून दिले. ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्याकरिता स्ट्राइकर क्रिकेट क्लबतर्फे नामपूर प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी तेंडुलकर्स, प्रफुल्ल वॉरिअर्स, मोसम टायगर्स, राज अ‍ॅपेक्स, शिका पार्टनर्स, मोसम टीचर्स अशा सहा संघांची निवड करण्यात आली. लिलाव पद्धतीद्वारे क्रिकेटपटूंची विविध संघांत निवड करण्यात आली.
खेळाडू निवडीचे सोपस्कार आयपीएलच्या धर्तीवर पार पडल्यानंतर नामपूर प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे सामने साखळी पद्धतीने खेळविण्यात आले. स्ट्राइकर्स क्लबच्या मैदानावर अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यांना प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. त्यांच्या प्रोत्साहनामुळे खेळाडूंनी उत्तम कामगिरी करण्यासाठी शर्थ केली. या प्रतिसादामुळे भारावलेल्या संयोजकांनी दरवर्षी जानेवारी महिन्यात एनपीएल आयोजित करण्याचे जाहीर केले. अंतिम सामन्यात तेंडुलकर्सने शिका पार्टनर्स संघाचा पराभव करून २१ हजार रुपये रोख व एनपीएल चषक मिळविला. उपविजेत्या शिका पार्टनर्सला ११ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. आदर्श बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या आरिफ खानला १५०१ रुपये व ऑरेंज कप तर प्रफुल्ल वॉरिअर्सचा जलदगती गोलंदाज नितीन मोहितेला सर्वाधिक बळी घेतल्याबद्दल १५०१ रुपये व मानाची पर्पल कॅप देऊन सन्मानित करण्यात आले.
पारितोषिक वितरण सोहळ्यास संघमालक कुणाल मुथा, विनोद सावंत, दीपक पाटील, राष्ट्रवादीचे डॉ. महेंद्र शिंदे, सचिन कापडणीस, योगेश जगताप, रोटरी क्लबचे अध्यक्ष नितेश ह्याळीज आदी मान्यवर उपस्थित होते. संतोष सामंत यानी सूत्रसंचालन केले. नामपूर हे तसे ३५ हजार लोकसंख्या असणारे गाव. तालुक्याप्रमाणे त्याचा तोंडवळा असला तरी बागलाण तालुक्यात नामपूरचा समावेश होतो. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील युवकांत क्रिकेटविषयी अतोनात प्रेम. या प्रेमातील उत्स्फूर्तता एनपीएल स्पर्धेद्वारे प्रगट झाली.