सशस्त्र सहा लुटारूंनी एका सराफा दुकानदाराला लुटले. जाताना लुटारूंनी केलेल्या गोळीबारात दुकानाचा नोकर जखमी झाला. पूर्व नागपुरातील हिवरी नगरात भरदुपारी ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने लुटारूंचा शोध सुरू केला असून शहराची नाकाबंदी करण्यात आली आहे.
हिवरीनगरातील हनुमान मंदिराजवळ श्री महालक्ष्मी ज्वेलर्स आहे. दुकान मालक सुरेंद्र गुमगावकर, त्यांचा मुलगा युवराज तसेच नोकर अनिकेत कडू हे तिघे दुकानात होते. अडीच ते पावणेतीन वाजताच्या दरम्यान तीन मोटारसायकलवर सहाजण आले. त्या सर्वानी चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळलेला होता. तिघे आत गेले. तिघे दुकानाबाहेर शटरजवळ उभे राहिले. आत गेलेल्या तिघांपैकी एकाने चाकू तर दुसऱ्याने देशी कट्टय़ाचा धाक दाखविला. ‘हिलना नही वरना.’ असा धाक दाखविला. सुरेंद्र व युवराजला जागेवरच उभे राहण्यास सांगितले. अनिकेतला दुकानातील बाकडय़ावर बसवले आणि चुपचाप बसून राहण्यास दरडावले. तिसऱ्या लुटारूने बॅगमध्ये शोकेसमधील सोन्या-चांदीचे दागिने भरण्यास सुरुवात केली. पटापट बॅगमध्ये ऐवज भरून ते लगेचच निघाले.
आतील तिघे बाहेर आल्यानंतर बाहेर उभ्या तिघांनी मोटारसायकल सुरू केली. आतील तिघे दुकानाबाहेर जाताच अनिकेत बाहेर आला आणि बाजूच्या दुकानात पळू लागला. ते पाहून एक लुटारू त्याच्या मागे धावला. अनिकेत दुकानात शिरला होता. बाहेरून एका लुटारूने त्याच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी अनिकेतच्या डोळ्याच्यावर कपाळाला चाटून गेली. त्यामुळे रक्तस्राव सुरू झाला. दुकानामागील घराच्या भिंतीवर गोळी आदळली. लुटारू लगेचच पळून गेले. सुमारे तीन ते चार मिनिटात हा प्रकार घडला. या परिसरातील दुकानदार लुटारूंच्या मागे धावले, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. जखमी अनिकेतला लगेचच राधाकृष्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे त्या परिसरात खळबळ उडाली. गोळी झाडल्याचा आवाज ऐकून घरातील लोक बाहेर पडले. दुकानासमोर नागरिकांची गर्दी झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जयस्वाल, उपनिरीक्षक अतुलकर यांच्यासह नंदनवन पोलीस, त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त एन.झेड. कुमरे व लकडगंज पोलीस तसेच गुन्हे शाखेचे पथक तेथे आले. या घटनेमुळे घाबरलेल्या दुकानदाराला त्यांनी दिलासा दिला. त्याची विचारपूस केली. पोलिसांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले. अत्यंत दाट लोकवस्तीचा हा भाग आहे. लहानशा खोलीत महालक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान असून त्यालगतच किराणा दुकान आहे. त्यानंतर गल्ली असून नंतर आणखी एक मोठे किराणा दुकान आहे. शेजारच्या किराणा दुकानात मालक, त्याचा भाऊ व नोकर होते. त्यांना मोटारसायकलवर आलेले लुटारू दिसले. मात्र, ग्राहक असावेत, असे त्यांना वाटले. दोन-तीन मिनिटानंतर अनिकेत पळत दुकानात आला तेव्हा हे तिघे घाबरले. एका लुटारूने त्यांच्यासमोरच अनिकेतच्या दिशेने गोळी झाडली. एक पाऊल जरी सरकला असता तर तीच गोळी या दुकानदाराला लागली असती. लुटारूही त्यांच्या दिशेने गोळी झाडू शकला असता. मात्र, सुदैवाने हे तिघे बचावले. लुटारू २५ ते ३० वर्षांचे होते. काळ्या रंगाच्या मोटारसायकली त्यांच्याजवळ होत्या. लुटारू अगदी झटपट गेले. त्यामुळे फारसा ऐवज त्यांना नेता आला नाही. नक्की किती ऐवज गेला, हे स्पष्ट झाले नसले तरी सुमारे तीस हजार रुपयांचा ऐवज लुटारूंनी नेला असावा. नंदनवन, लकडगंज व गुन्हे शाखेच्या पथकांनी तातडीने तपास सुरू केला. लुटारू या परिसरातील असावेत, अशी पोलिसांना शंका आहे. पोलीस आयुक्त कौशल पाठक, पोलीस उपायुक्त चंद्रकिशोर मीणा व संजय दराडे तसेच आमदार कृष्णा खोपडे, सराफा दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे भेट दिली.