समाजातील विविध घटकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी विमा आणि निवृत्तिवेतनविषयक तीन योजनांची सुरुवात देशात ११७ ठिकाणी एकाच वेळी होणार असून येथे शनिवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत योजनेचे उद्घाटन होणार आहे.
जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध बँकांच्या अधिकाऱ्यांची यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते, जिल्ह्य़ातील अग्रणी बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रादेशिक व्यवस्थापक राजन लोंढे, एन. बी. अग्रवाल आदी उपस्थित होते.
या वेळी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांच्या कार्यवाहीबद्दल चर्चा करण्यात आली. असंघटित क्षेत्रातील घटकांसाठी अटल पेन्शन योजना महत्त्वपूर्ण आहे. योजनांबाबतची माहिती आणि अर्ज सर्व बँक शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.