शिवाजीनगरजवळील रेंजहिल्स कॉर्नर हा पीएमपीचा बसथांबा दोन दिवसांपूर्वी चोरीला गेला असून या चोरीची अधिकृत तक्रार पीएमपीतर्फे बुधवारी चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. मात्र, या बसथांब्याची जागा यापूर्वीही दोन-तीनदा बदलण्यात आली होती आणि कोणाच्या तरी फायद्यासाठीच हा प्रकार सुरू आहे, असा आरोप स्थानिक नगरसेवक राजू पवार यांनी केला आहे.
शिवाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या पीएमपीच्या गाडय़ांसाठी असलेला रेंजहिल्स कॉर्नर हा बसथांबा जागेवर नसल्याची माहिती मिळाल्यानंतर पवार यांनी जागेवर जाऊन दोन दिवसांपूर्वी पाहणी केली. राष्ट्रकुल स्पर्धाच्या वेळी हा थांबा बसवण्यात आला होता. त्याची लांबी तीस फूट इतकी होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीण अष्टीकर यांच्याशी संपर्क साधून पवार यांनी त्यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्यानंतर पीएमपीकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे पवार यांनी महापालिकेचे उपायुक्त विजय दहिभाते यांच्याकडे जाऊन तक्रार केली. त्यावेळी हा थांबा काढण्यासाठी आम्ही परवानगी दिलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पीएमपी आणि महापालिका प्रशासनातील अधिकारी थांबा काढण्याची परवानगी दिलेली नाही, असे सांगत असूनही जागेवर मात्र थांबा नाही, ही बाब मी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर बुधवारी पीएमपीचे अधिकारी शशिकांत भोकरे, विजय गायकवाड, तिकीट तपासनीस गुलाब परदेशी यांनी जागेवर येऊन पाहणी केली आणि अखेर परदेशी यांनी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दिली, अशी माहिती नगरसेवक पवार यांनी दिली.
येथील नागरिकांना रेंजहिल्स कॉर्नरचा पीएमपी थांबा हलवण्यावरून सातत्याने त्रास दिला जात आहे. याच बसथांब्याची जागा आतापर्यंत दोन-तीन वेळा बदलण्यात आली आहे. बिल्डरच्या सोयीसाठी हा थांबा हलवला जात आहे, असा आरोप पवार यांनी केला असून तोच थांबा आता चोरीला गेल्यामुळे वेगळेच चित्र दिसत आहे, असेही ते म्हणाले. पीएमपीतर्फे जी तक्रार देण्यात आली आहे त्या तक्रारीत शिवाजीनगरजवळ असलेल्या लोकमंगलसमोरील दोन बसथांबेही काढून नेल्याची नोंद संबंधित चौकीत करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.