दिवाळीच्या काळात पीएमपी गाडय़ांसाठी बाजीराव रस्ता आणि लक्ष्मी रस्ता बंद करण्याचा जो निर्णय घेण्यात आला तो कायद्याला धरून नाही आणि हा निर्णय खासगी वाहतुकीलाही प्रोत्साहन देणारा होता, अशी टीका स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.
दिवाळीत बाजीराव रस्ता आणि लक्ष्मी रस्ता पीएमपीच्या गाडय़ांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, या रस्त्यांवरील पीएमपीची वाहतूक बंद करताना त्या निर्णयाची माहिती प्रवाशांना देण्यात आली नाही. तसेच ही माहिती जाहीरही करण्यात आली नाही. ज्या दोन रस्त्यांवरून पीएमपीला बंदी करण्यात आली त्या मार्गावरून जाणाऱ्या पीएमपी गाडय़ांची कोणतीही पर्यायी व्यवस्था देखील करण्यात आली नाही. या उलट याच रस्त्यांवर इतर खासगी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. पीएमपी बंद करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा होता आणि त्यामुळे हजारो सर्वसामान्य प्रवाशांची ऐन दिवाळीच्या काळात मोठी गैरसोय झाली, अशी तक्रार पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी आणि सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी प्रशासनाकडे केली आहे. हा निर्णय खासगी वाहनांना तसेच खासगी वाहतुकीला प्रोत्साहन देणारा आहे, असे राठी आणि वेलणकर यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गर्दीच्या रस्त्यांवर सर्व प्रकारच्या खासगी वाहतुकीला परवानगी देणे आणि फक्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या पीएमपीवर बंदी घालणे हे धोरण परस्परविरोधी आहे. वास्तविक, सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचे धोरण महापालिका, वाहतूक पोलीस आणि पीएमपी या तिन्ही यंत्रणांनी अवलंबणे आवश्यक असताना तसे न करता पीएमपीलाच बंदी घालण्यात आली. हा निर्णय चुकीचा आहे, असेही या संस्थांचे म्हणणे आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिसावधानता बाळगण्याची जेव्हा गरज असेल, तेव्हाच पीएमपी गाडय़ांना रस्ते बंद करणे सयुक्तिक ठरेल. अन्यथा पीएमपी गाडय़ांना केव्हाही, कोणत्याही रस्त्यांवर बंदी असता कामा नये. मात्र, तसे धोरण न अवलंबता खासगी वाहतुकीला प्रोत्साहन देणारे धोरण प्रशासन अवलंबत आहे, अशीही तक्रार करण्यात आली आहे.
पुणे आणि पिंपरीतील लाखो प्रवासी पीएमपी सेवेवर अवलंबून असले, तरी अत्यंत अकार्यक्षम व असंवेदशील पीएमपी प्रशासनाबरोबरच संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणाही प्रवाशांकडे दुर्लक्ष करत आहेत. महत्त्वाच्या रस्त्यांवर पीएमपी बंद करण्याचा निर्णय हेही याचेच उदाहरण आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.