अंगणवाडी सेविकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर लाटणे मोर्चा काढला. आंदोलकांनी जोरदार निदर्शने करीत मागण्यांची पूर्तता व्हावी असा नारा दिला. आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
    राज्यातील अंगणवाडी सेविकांनी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. कामबंद आंदोलनाचा आज २४वा दिवस होता. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी थाळीनाद, भीक माग अशाप्रकारची आंदोलने यापूर्वी करण्यात आली आहेत. आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका संघटनेच्या वतीने लाटणे मोर्चाचे आयोजन केले होते. बिंदू चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यावर तेथे शासकीय नोकरीत कायम करण्यात यावे, रिक्त पदे भरावीत आदी मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलनाचे नेतृत्व कॉ. नामदेव गावडे यांनी केले.