काय हे गंधे कृपा झाली, पारखी जाहले गटनेते
कसे सांभाळावे त्यांनी १२ जणांचे ओझे
एक कुठे इकडे तर दुजा कुठे तिकडे
दे ताकद त्यांना, दे शक्ती त्यांना
मागणे लयि नाही, लयि नाही ।।
महापालिका आमची न्यारी, तिची दिवाळी भारी
रस्ते, पाणी, वीज असू दे नीट, मागणे लयि नाही, लयि नाही ।। १।।
महापौर आमच्या शिंदेबाई, पण कारभार पाहती त्यांचे पती
पतीप्रभावातून त्यांना बाहेर घेई, मागणे लयि नाही, लयि नाही ।। २ ।।
उपमहापौरपदी बसल्या काळेताई, सख्य नसे त्यांचे शिंदेबाईंशी
दोघींचे चांगले मैत्र होऊ दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ३ ।।
सभापती बाबासाहेब वाकळे, पदांसाठी त्यांचे श्रेष्ठींना कायम साकडे
रेखांकनाचे जाऊ दे, काम त्यांच्याकडून होऊ दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ४ ।।
सभागृह नेते अशोक बडे, सभागृहात ना होती कधी खडे
सभा त्यांना चालवायला मिळू दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ५ ।।
पाऊलबुद्धे आमचे विरोधी पक्षनेते, मोठा आवाज बोलणे मिठे
आवाजाला चांगले वजन येऊ दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ६ ।।
कल्याण महिला, बालकांचे आणि किरण व मालनताईंचे
समितीला त्यांच्या धनलाभ होऊ दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ७ ।।
प्रतीमहापौर शिंदे अनिल, उपमहापौर म्हणजे काळे सुनील
त्यांच्या कुरघोडय़ा बंद होऊ दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ८ ।।
मनसेचे फक्त दोघे, परी हत्तीसारखे पक्के आणि बेरके
मनपातील त्यांची कोंडी फुटू दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ९ ।।
बोराटेंचे बाळासाहेब, कधी तळ्यात, कधी मळ्यात
जागा एकदाची पक्की होऊ दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। १० ।।
लोंढे आणि पंधाडे, सेनेला पाडती खिंडारे
गद्दारीचा शिक्का निघू दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ११ ।।
रंगोलीचे सातपुते गप्प बसती आणि अभ्यासे हळूच प्रकटती
जमीनजुमल्यातून बाहेर येऊ दे त्यांना, मागणे लयि नाही, लयि नाही ।। १२ ।।
बोलक्या सेनेत बाकी सगळे मौनी आणि मांजरही! ढाणे नाही,
किमान वाघ तरी होऊ दे त्यांना, मागणे लयि नाही, लयि नाही ।। १३ ।।
पारखी, चोपडा आणि लोखंडे, कवडे, जाधव सवे विनित असे
रस्त्यांचे मॅटर मार्गी लागू दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। १४ ।।
केडगावचे शिवाजीराव, पत्रक काढतात तावचे ताव
नाव त्यांचे होऊ दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। १५ ।।
गाडेंनी लावले बारस्करांना नादी, अडिच वर्षे सोडली नाही गादी
पोपटरावांनाही काही मिळू दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। १६ ।।
नावातच असे संग्राम, म्हणून रावडी सैन्य कायम जवळी
मंडळींची गेली संधी परत मिळू दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। १७ ।।
संदीप आणि सुवर्णा, पडली त्यांच्यावर कृष्णछाया
त्यातून लवकर बाहेर पडू दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। १८ ।।
पवार आणि वारे, वाहवा रे वाहवा रे, उपनगरांचे तारणहार रे
कामाला त्यांना वाव मिळू दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। १९ ।।
धावून, ओरडून, प्रश्न मांडती, नाव त्यांचे खरमाळे संगीता
मिळो मनासारखे पद त्यांना, मागणे लयि नाही, लयि नाही ।। २० ।।
नजीर शेख, अरिफ शेख, पदे भोगली दोघांनी बेस्ट,
बाकीच्यांना उपास, तो संपू दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। २१ ।।
नगरसेवक सारे असे गुणाचे, झाकावे एकाला दुसऱ्याला काढावे
चालणे, वागणे, बोलणे त्यांचे सुधारू दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। २२ ।।
आणि देवा…..
आयुक्त आमचे कुलकर्णी, आखली मोहीम की ती कर्णोपकर्णी
अतिक्रमणासाठी हातोडा उठू दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। २३ ।।
उपायुक्त डॉ. डोईफोडे, डोईत त्यांच्या कायकाय असे,
आंदोलन, मोर्चातून सुटका होऊ दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। २४ ।।
दुसऱ्या उपायुक्त झगडेबाई, झगडा सारखा त्यांचा साऱ्यांशी होई
रजेवरून परत येऊ दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। २५ ।।
आणि आमचे सहायक आयुक्त, परेशान परशरामे
परेशानी त्यांची दूर होऊ दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। २६ ।।
शहर अभियंता मगर, त्यांच्यामागे सारखी गुप्त नजर
मोकळेपणा मिळू दे त्यांना, मागणे लयि नाही, लयि नाही ।। २७ ।।
निवृत्ती हवी, निवृत्ती हवी हा घोष निकमांचा, आता मेहेत्रेंचाही
निवृत्तीचा त्यांना विसर पडू दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। २८ ।।
अन्य अभियंत्यांचे काय सांगावे, जणू सारी के. विश्वेश्नरय्यांचीच लेकरे
कामाचे त्यांना कळू दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। २९ ।।
मेश्राम आणि शेलार, वित्तचे त्यांना अधिकार
अर्थ त्याचा उमगू दे त्यांना, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ३० ।।
बोरगे, राजूरकर, पैठणकर, मनपाचे सर्व डॉक्टर, तरी आरोग्य वाऱ्यावर
शहर सारे निरोगी, निरामय होऊ दे, मागणे लयि नाही, लयि नाही  ।। ३१ ।।
कचरा, नाली, गटारे यांची खराबी, पैठणकरांना डोकेदुखी
नालेसफाईची कटकट मिटू दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ३२ ।।
बल्लाळ आणि विश्वनाथ दहे, रचनेशिवायच नवे नगर राहते आहे उभे
थोडी तरी दिशा मिळू दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ३३ ।।
उद्यानचे गोयल आणि म्हसे, बागबगीच्यांचे त्यांना वावडे
वृक्षराजीचे प्रेम त्यांना वाटू दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ३४ ।।
देशपांडे, ढवळे, तांबोळी, पारगावकर, बाबू, लयचेटी, घरी जायची खोटी
वेळेवर जाया मिळो त्यांना, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ३५ ।।
कामगार सारे गुणी, गुणवंत खरे, लोखंडे देती त्यांना अनंत मागण्यांचे धडे,
कामाची आच त्यांच्यात येऊ दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ३६ ।।
हे देवा….
ठेकेदार कसले, गार गार ए. सी. कोठारे असलेले,
निवृत्ती नको, कामे मिळू दे त्यांना, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ३७ ।।
कामासाठी सगळ्यांवर मेहेरनजर, असे बेस्टचे मेहेर
गणपतीचे काम तरी नीट होऊ दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ३८ ।।
टेबल टेनिस खेळतात मुथा, कामाचे मात्र वाजतात बारा
मोठय़ा कामांना तरी न्याय मिळू दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ३९ ।।
विनू काळे आणि मंडळी, लोणकर त्यांचे म्होरके,
बील निघू दे सारखेसारखे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ४० ।।
मंडलेचा सोनी, आणखी कोणी कोणी, बिलासाठी लावतात लोणी
कामाला त्यांच्या दर्जा मिळू दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ४१ ।।
शेख, आनंद, इरफान सारेच कसे पुंड, फरक ना उमगे कधी
पुंडगिरी त्यांची कमी होऊ दे, मागणे लयि नाही, लयि नाही ।। ४२ ।।
देवाधिदेवा, ही अशी ४२ श्लोकी, नगरी महापालिका खाशी
वाट तिला चांगली मिळू दे, मागणे लयि नाही, लयि नाही  ।। ४३ ।।